राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्याकडून अटकेचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंगळवारी काही विशिष्ट भागातच आंदोलन झाल्याची ओरड झाल्यानंतर बुधवारी भुजबळ यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे माजी आमदार दिलीप बनकर हे पुन्हा रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले. शिरवाडे फाटा येथे झालेल्या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही सक्त वसुली संचालनालयाने अटक केली. या कारवाईचे पडसाद मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको, येवला व नांदगाव मतदार संघातील काही गावांत बंद, नाशिक शहरात भाजपचे खा. किरीट सोमय्या यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन आणि आंदोलन असे त्याचे स्वरूप होते, परंतु आंदोलनात नेहमीसारखा विशेष जोर पाहावयास मिळाला नाही. तसेच काही विशिष्ट भागांत आणि काही विशिष्ट कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचे दिसून आले.

या मुद्दय़ावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते फारसे आक्रमक नसल्याची ओरड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी पदाधिकारी रस्त्यावर उतरले. त्यात माजी आमदार दिलीप बनकर यांचाही समावेश होता. बुधवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा येथे निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सलग ११ तास चौकशी केल्यावर सक्त वसुली संचालनालयाने भुजबळ यांना अटक केली. वास्तविक, चौकशीला संपूर्ण सहकार्य करण्यास ते तयार असताना केवळ राजकीय आकसापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत. त्यात भुजबळ यांचा एक आणि उर्वरितांचा दुसरा गट आहे. बनकर हे दुसऱ्या गटातील मानले जातात. अनेक मुद्दय़ांवर त्यांचे याआधी भुजबळांशी अप्रत्यक्षपणे मतभेद झाल्याचे सांगितले जाते. परंतु पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला अटक झाल्यानंतर स्थानिक पातळीवर शांतता होती, असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी निफाड तालुक्यात सलग दोन दिवस आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.