शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मानसिकता रुजविणे आणि कृती संशोधनात रुची निर्माण करणे, या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त मराठी विज्ञान परिषद नाशिक शाखा आणि रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्यातर्फे ‘आदर्श नाशिक – एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ या संशोधनात्मक प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ४० प्रकल्पांचे अनोखे विज्ञान प्रदर्शन २७ व २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सावरकर नगरमधील नवरचना विद्यालयात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोंडगे यांच्या हस्ते तर समारोप सोहळ्यास ‘आवास’च्या सल्लागार सुलक्षणा महाजन उपस्थित राहणार आहेत.
मागील काही महिन्यांत ‘स्मार्ट सिटी’ या विषयावर बरीच चर्चा झाली. त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या अपेक्षा पालिकेच्या सर्वेक्षणात अधोरेखीत केल्या. या घडामोडीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसे दुर्लक्षितच राहिले. त्यांची मते वा कल्पना जाणून घेण्याची तसदी कोणी घेतली नाही. विज्ञान परिषद व रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या या उपक्रमाने मात्र त्यास छेद दिला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थीच नव्हे तर, नागरिकांनाही आदर्श नाशिकची संकल्पना मांडण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, या संकल्पना वैज्ञानिक असल्याने त्यांचा प्रत्यक्ष वापर करणेही शक्य होणार आहे. या उपक्रमासाठी शालेय (इयत्ता सहावी ते नववी) आणि खुला (१५ वर्षांवरील सर्व) असे दोन गट करून गटनिहाय विषय देण्यात आले. स्पर्धकांना मार्गदर्शनासाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक केली गेली. स्पर्धकांना प्रत्यक्ष काम करून पर्यावरणपूरक प्रकल्प सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
सादरीकरणासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करत ६० स्पर्धकांनी आपले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. त्यातून पहिल्या फेरीत ४० प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या अविष्काराचे सादरीकरण २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या उपक्रमातील विजेत्यांना उत्कृष्ट प्रकल्प, उत्कृष्ट प्रकल्प सादरीकरण, उत्कृष्ट निष्कर्षांची उपयुक्तता असे पुरस्कार देण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण रविवारी सायंकाळी सुलक्षणा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनासाठी समन्वयक म्हणून परिषदेचे संगीता मुठाळ, डॉ. धनंजय आहेर यांनी तर संघाचे सीमा भदाणे, तरंग चिटणीस यांनी काम पाहिले. नागरिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कौस्तुभ मेहता यांनी केले आहे.