कळवण तालुक्यातील अहिवंत किल्ल्यावर येथील गडकोट किल्ल्यांचे संवर्धनाचे काम हाती घेतलेल्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठाने स्वच्छता मोहीम राबवली. जिल्ह्यतील संवर्धनाचा हा २६ वा किल्ला आहे.

अहिवंत किल्ल्यावर जाण्यासाठी प्रतिष्ठानने अवघड वाट निवडली होती. अहिवंत गावात जाऊन तेथून गडावर चढाई सुरू केली. या चढाई दरम्यान, इंग्रजांनी किल्ल्याचे मोठे नुकसान केले असून तोफा लावून किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले. गडावर पडक्या घरांचे अवशेष, तटबंदी, दरवाजे, ज्योती, इमारती दिसतात. हे सर्व अवशेष पाहिल्यावर गडावर मोठी वस्ती असल्याचे लक्षात येते.

किल्ल्यावर कातळात खोदलेल्या गुफा आहेत. आवळा, करवंदे आणि उंबराच्या हिरव्यागार वृक्षराईने किल्ला परिसर नटलेला आहे. या ठिकाणी पडीत वाडय़ांच्या नक्षीकाम केलेले शेकडो दगड पडलेले एकत्रित करून एक चौथरा चार तासांच्या श्रमदानातून तयार करण्यात आला.

मोरोपंत पिंगळे यांनी कांचनबारीच्या विजयानंतर १६७० मध्ये हा किल्ला मोगलांकडून जिंकला होता. शिवाजी राजे यांचे अमात्य रामचंद्रपंताच्या आज्ञापत्रात या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्व गावांमध्ये मुबलक पाणी असून उन्हाळ्यात सर्व गावांतील शेती हिरवीगार पाहावयास मिळते. या किल्ल्यावर वनफुले, विविध जातीची फुलपाखरेही दिसतात. तसेच दुर्मीळ होत चाललेल्या भारतीय गिधाडांच्या दोन प्रजाती आढळल्या. या किल्ल्यावर भारतीय गिधांडांची दोन घरटी आणि चार पक्षी शोधून काढण्यात प्रतिष्ठानला यश आले. किल्ल्यांच्या कपारीतही ही घरटी आढळून आली.

या गिधाडांची संख्या वाढवायची असल्यास अहिवंत गावाच्या पायथ्याशी त्यांच्यासाठी उपाहारगृह सुरू करता येईल, याकडे प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. आनंद बोरा यांनी लक्ष वेधले आहे.