नाशिक : शहराजवळील दरी-मातोरी रस्त्यावर मालवाहतूक वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने तीन वर्षांच्या मुलासह त्याचे आईवडील, दुचाकी चालक असे चार जण ठार झाले. अपघातानंतर जीपचालक वाहन सोडून फरार झाला आहे.

टाळेबंदी काहीशी शिथिल करण्यात आल्यावर रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असून परिणामी, अपघातही वाढले आहेत. सोमवारी दुपारी मखमलाबादच्या दिशेने दुचाकीवरून लहान चिमुकल्याला घेऊन शेतमजूर प्रवास करत होते. मखमलाबादकडून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक जीपच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनाचा वेग वाढविला. परिणामी मालवाहतूक वाहनाची दुचाकीला धडक बसली. ही धडक जोरात बसल्याने दुचाकीवरील चौघे दूरवर फेकले गेले.

या अपघातात केशव खोडे, त्यांची पत्नी मीराबाई (रा. ओझरखेड) आणि  त्यांचा मुलगा अनिल (तीन) यांच्यासह दुचाकी चालक दिलीप दिवे (रा. सापगाव) हे चौघे जागीच ठार झाले.

अपघात घडताच चालक वाहन तेथेच टाकून फरार झाला. या घटनेची माहिती स्थानिकांनी म्हसरूळ पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून चौघांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.