लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा

विभागीय प्राथमिक फेरीत परीक्षकांनी दिलेल्या सूचना, सादरीकरणात झालेल्या चुका आणि तांत्रिक अडचणींची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय अंतिम स्पर्धेत प्रवेश केलेल्या चारही संघांनी आपल्या तालमींवर लक्ष केंद्रीत केले आहे. सोमवारी होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीत आपले कौशल्य दाखवून महाअंतिम फेरीसाठी मुंबई गाठायचीच, या ईर्षेने चारही संघ कामाला लागले आहेत.

लोकसत्ता लोकांकिकेच्या प्राथमिक फेरीतून के.टी.एच.एम. महाविद्यालय, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, हं. प्रा.ठा. कला आणि मालेगाव येथील म. स. गा. महाविद्यालयांनी अंतिम फेरी गाठली आहे. विभागीय अंतिम फेरीसाठी ४८ तासांचा अवधी बाकी असतांना अंतिम टप्प्यात तयारीवर सर्वानी जोर दिला आहे. यासंदर्भात केटीएचएमच्या साहिल पाटीलने विभागीय अंतिम फेरीत पोहचल्यामुळे संपूर्ण संघ उत्साहात असल्याचे सांगितले. मुंबईला जाण्याची जिद्द बाळगून सर्व कलाकार, तंत्रज्ञ एक होऊन मेहनत घेत आहेत. सकाळी सातपासून ते रात्री नऊपर्यंत न थांबता तालमी सुरू आहेत. प्राथमिक फेरीदरम्यान परीक्षकांनी केलेल्या सूचनेनुसार एकांकिकेतील काही प्रसंग वाढवून अधिक ठळकपणे समोर येण्यावर काम सुरू आहे. एकांकिकेला गती देण्यासाठी काही प्रसंगांची पुनर्बाधणी केली आहे. कथेतील काही त्रुटी टाळून एकांकिका निदरेषपणे सादर करण्यावर भर दिला आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या बाजू भक्कम करून एकांकिका जास्तीतजास्त प्रभावशाली करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्याने सांगितले.  हं.प्रा.ठा. कला महाविद्यालयाच्या महिमा ठोंबरेने संघातील सर्व विद्यार्थी महाविद्यालयातील वर्ग, प्रात्यक्षिक, परीक्षा यांचे नियोजन करून एकांकिकेच्या तालमींसाठी जास्तीत जास्त वेळ देत असल्याचे सांगितले. नाटकाचा विषय वर्तमानकालीन असल्याने परीक्षकांच्या सूचनेनुसार एकांकिका अधिक टोकदार करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक मार्गदर्शन करीत आहेत.

पुणे, मुंबई, औरंगाबाद या संघांच्या बरोबरीने तांत्रिक बाजू भक्कमपणे हाताळण्याचा संघाचा प्रयत्न आहे. तालमींसाठी लागणारी जागा, विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी महाविद्यालयाकडून आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे कलाकारांना एकांकिकेवर लक्ष केंद्रित करता येते. संघ मोठा आणि नवीन असल्याने अधिकाधिक रंगीत तालीमी होणे गरजेचे असून त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत.  ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा केवळ शहरी नव्हे, तर ग्रामीण विद्यार्थ्यांंच्या कलागुणांना मोठे व्यासपीठ निर्माण करत असल्याने मालेगावसारख्या ग्रामीण भागातून सामील होणारा म.स.गा. महाविद्यालयाचा संघ विभागीय अंतिम फेरीत यश मिळवून संधीचे सोने करण्यास उत्सुक असल्याचे तुषार पवार सांगतो. परीक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सादरीकरणातील क्षुल्लक चुका टाळून काही नवीन बदल एकांकिकेतून दिसतील. तसेच सर्व कलाकार अभिनय सहज कसा होईल, यासाठी संवादफेक, हावभाव यांवर दिवसाचे सलग सात ते आठ तास मेहनत घेत आहेत. संघाला कोणत्याही आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ  लागू नये म्हणून प्राध्यापक स्वखर्चाने गरजेच्या गोष्टींची पूर्तता करत असल्याचे तुषारने सांगितले. शहरी स्पर्धकांना मागे टाकून नेहमी दुर्लक्षित केला जाणारा ग्रामीण संघ यावेळेस बाजी मारेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

मुंबईला होणाऱ्या महाअंतिम फेरीत दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शहा उपस्थित राहणार असल्याने या फेरीचे आकर्षण अधिक वाढले आहे. एनबीटी विधी महाविद्यालयाचा संघ एकांकिका सर्वोत्तम होण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेत असल्याचे रिद्धी भावसारने सांगितले. एकांकिकेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शेवटची फिनिशिंग सुरू असल्याचेही रिद्धीने नमूद केले.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.