‘मसाप’नाशिक शाखेतर्फे आयोजन

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्या वतीने शनिवारी नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटर रस्त्यावरील जैन भवनात शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘मसाप’च्या नाशिक शाखेचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड हे अध्यक्ष तर माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापौर रंजना भानसी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

फादर दिब्रिटो यांनी वैचारिक लेख, ललित साहित्य, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र आदींचे विपुल लेखन केले आहे. परिवर्तनासाठी धर्म आणि पर्वतावरील प्रवचन हे त्यांचे वैचारिक ग्रंथ आहेत. फादर दिब्रिटो यांना २०११ मध्ये ‘नवा करार’ या कृतीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

समाजसेवेबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा २०१२-१३ चा ज्ञानोबा-तुकोबा पुरस्काराने गौरव केला आहे. फादर दिब्रिटो यांच्या नागरी सत्कारास सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखेचे कार्याध्यक्ष

उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रमुख कार्यवाह प्रसाद पवार, रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई, जिल्हा प्रतिनिधी नितीन ठाकरे आदींनी केले आहे.