X

पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग करून फसवणूक

संगतानी यांचा कारखान्यांना बॉयलर बंद करण्यासाठी लागणाऱ्या ऑईल विक्रीचा व्यवसाय आहे.

गंगापूर पोलीस ठाण्यात बँक व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांवर गुन्हा

ऑईल पुरवठादाराच्या खात्यात धनादेशाद्वारे जमा झालेली सहा लाखाची रक्कम बँक व्यवस्थापनाने परस्पर कारखानदाराच्या खात्यात वर्ग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी ठाणे जनता बँकेच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शंकर संगतानी (टाकळीरोड) यांनी तक्रार दिली. संगतानी यांचा कारखान्यांना बॉयलर बंद करण्यासाठी लागणाऱ्या ऑईल विक्रीचा व्यवसाय आहे.

शहरातील सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांना ते ऑईलचा पुरवठा करतात. सातपूर औद्योगिक वसाहतीतील राधेय फोर्जिंग कारखान्यास त्यांनी मार्च २०१२ मध्ये ऑईलचा पुरवठा केला होता. त्यापोटी कारखाना व्यवस्थापनाने त्यांना सहा लाख रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश त्यांनी व्यवसायाचे चालू खाते असलेल्या ठाणे जनता सहकारी बँकेच्या सावरकरनगर शाखेत वटण्यासाठी टाकला होता. याच शाखेत राधेय फोर्जिग कारखान्याचेही खाते असल्याने बँक व्यवस्थापनाने तात्काळ रक्कम संगतानी यांच्या खात्यात वर्ग केली. कालांतराने बँक व्यवस्थापनाने संगतानी यांची परवानगी अथवा स्वाक्षरी न घेता परस्पर राधेय फोर्जिंग कारखान्याच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करून दिली.संगतानी यांनी रकमेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. पण बँक व्यवस्थापनाकडून टोलवाटोलवी केली जात असल्याने संगतानी यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बँक व्यवस्थापक दंडवते, साहाय्यक व्यवस्थापक परदेशी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.