कळवणमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न
शहरातील सायबर गुन्हेगारीचे लोण आता ग्रामीण भागातही पोहचले आहे. बँक खात्याचा एटीएम संकेतांक विचारून संशयिताने परस्पर बँक खात्यातून रक्कम काढून घेतली तर दुसऱ्या घटनेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी अनुक्रमे मालेगाव तालुका व कळवण पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
मालेगावच्या धाणेगाव परिसरात तुळसाबाई आहेर राहतात. एका खासगी कंपनीत त्या कामास असून त्यांचे बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका व्यक्तीचा फोन आला. मी स्टेट बँकेचा व्यवस्थापक बोलत आहे, तुमचा खाते क्रमांक द्या नाहीतर एटीएम बंद होऊन जाईल असा हिंदी भाषेतून इशारा देत खाते क्रमांक व एटीएमचा संकेत क्रमांक त्याने काढून घेतला. अपेक्षित माहिती मिळाल्यानंतर अहिरे यांच्या खात्यावरील २७ हजार रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना कळवण येथे घडली. कळवण येथे चोरटय़ांनी थेट एटीएमवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मध्यवर्ती भागात असलेल्या एचडीएफसी बँक शेजारी एसबीआयचे एटीएम आहे. सोमवारी नेहमी प्रमाणे ग्राहकांची एटीएममध्ये पैसे काढण्याची ये-जा सुरू होती. दुपारी दोन ते तीनच्या सुमारास सुरक्षा रक्षक नसल्याने पाहून संशयितांनी एटीएम केंद्रात प्रवेश केला. मशीन तोडून पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात बराच वेळ गेल्याने अन्य कोणाची चाहुल लागल्याने संशयिताने पलायन केले. या प्रकरणी मानूर येथील उदय कुलकर्णी यांनी कळवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, एटीएम केंद्राच्या आवारात असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काही तांत्रिक अडचणींमुळे पाहण्यात अडचणी येत असून त्या वेळी सुरक्षा रक्षक नेमका कुठे होता, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भात बँकेशी पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.