त्र्यंबकेश्वर देवस्थानमधील प्रकार; दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केलेल्या देणगी दर्शनात अडीच ते तीन लाख रुपयांचा अपहार करण्याचा प्रकार उघड झाला आहे. देणगी दर्शन कार्यालयातील सीसी टीव्ही बंद करून संशयित हा उद्योग करीत असल्याचे तक्रारीत म्हटले असून दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशभरातील भाविकांची गर्दी होत असते. सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. कित्येक तास रांगेत तिष्ठत राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सुमारे तीन वर्षांपूर्वी  देवस्थानने देणगी दर्शनाची सुविधा उपलब्ध केली. यामध्ये रुपये २०० देणगी घेऊन भाविकांना तत्काळ दर्शनाची व्यवस्था केली जाते. या माध्यमातून देवस्थानच्या उत्पन्नातही भर पडत असल्याचा काही विश्वस्तांचा दावा आहे. परंतु, देणगी दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी कार्यरत अन्य खासगी ट्रस्टला अडचणीचे ठरले.

त्र्यंबकमधील काही घटकांनी या व्यवस्थेवर आक्षेप घेऊन ते बंद करण्याची मागणी केली, तरीही  देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी असणारी ही सुविधा कायम ठेवली. या देणगी दर्शनातून देवस्थानला महिन्याकाठी ३० ते ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. देणगी दर्शन कार्यालयात काम करणारे संशयित अमोल येले आणि देवीदास गाडे (रा. त्र्यंबकेश्वर) या कर्मचाऱ्यांनी देवस्थानची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, देणगी दर्शनातील फसवणुकीच्या प्रकाराने त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन लवकर मिळावे याकरिता स्थानिक पातळीवर अनेक घटक कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी पूजा विधी, तत्सम कारणावरून पुरोहितांसोबत कोणत्याही वेळी दर्शनासाठी जाता येत असे.

सिंहस्थाआधी देवस्थानने पुरोहितांबरोबर येणाऱ्या भाविकांच्या प्रवेशासाठी सकाळी एक तासाची वेळ निश्चित केली. पहाटेपासून रात्रीपर्यंत मंदिर खुले ठेऊन अधिकाधिक भाविकांना प्रवेश मिळेल अशी व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. परंतु, दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना प्राथमिक सुविधांची वानवा आहे. ‘खास’ भाविकांसाठी विशेष व्यवस्था होत असली तरी सामान्य भाविकांचा विचार केला जात नसल्याचा अनेकांचा आक्षेप आहे.

सीसीटीव्ही बंद ठेवून अपहार

देणगी दर्शन कार्यालयातील कर्मचारी संशयित अमोल येले आणि देवीदास गाडे (रा. त्र्यंबकेश्वर) काही फेरफार करीत असल्याचा विश्वस्तांना संशय होता. महत्त्वाची बाब म्हणजे, फसवणुकीचा प्रकार उघड होऊ नये म्हणून संशयित देणगी दर्शन कार्यालयातील चालु असणारे सीसी टीव्ही कॅमेरे बंद करत. ही बाब लक्षात आल्यावर मंदिर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना काही सुचना दिल्या गेल्या. २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत संशयित कर्मचाऱ्यांनी सीसी टीव्ही कॅमेरे बंद केले होते. भाविकांकडून देणगी दर्शनाचे पैसे घेऊनही प्रवेशपत्र दिले नाही. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संशयितांनी दोन ते अडीच लाख रुपयांचा अपहार करून देवस्थानची फसवणूक केल्याची तक्रार अमित टोकेकर यांनी दिली आहे. या तक्रारीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात येले, गाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.