म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शहरात तोतया पत्रकारास एक कोटी २५ लाखांची खंडणीची मागणी करून पैसे स्विकारतांना अटक करण्यात आली. या तोतयाविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला गुरूवापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील बाबासाहेब थेटे (५१) यांच्या विरोधात कल्याण येथे ‘आधार’ यु टय़ूब चॅनेल चालविणारा तोतया पत्रकार विनायक कांगणे हा बातम्या प्रसिध्द करत होता. यामुळे थेटे यांची बदनामी झाली. या आक्षेपाह्र्य़ बातम्या थांबविण्याची मागणी थेटे यांनी केली असता त्यासाठी विनायकने दोन कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडअंती ही रक्कम एक कोटी २५ लाख ठरली. विनायकने ही रक्कम नाशिक येथील दिंडोरी रोडवरील हॉटेल करी लिव्हज् येथे स्वीकारण्याचे ठरले. दरम्यान थेटे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनायकविरूध्द खंडणी मागितल्याची तक्रार केल्याने पोलिसांनी सापळा रचला. काही रोख रक्कम आणि काही बनावट नोटा देत थेटे यांना पोलीस पथकासह हॉटेल करी लिव्हज् येथे रवाना केले. त्यानंतर विनायकने थेटे यांना हॉटेलऐवजी नाशिकरोड येथे मित्राच्या घरी बोलावले.

नाशिकरोड येथे मित्राच्या घरी थेटे हे विनायकला पैसे देत असतांना पोलिसांनी विनायकला रंगेहात पकडले. पोलिसांनी विनायकविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता १० ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.