साखळी विपणन योजनांचाही वापर, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

माऊली क्रेडिट सोसायटी, संकल्पसिद्धी अपहार प्रकरण

नाशिक : जादा परताव्याचे आमिष दाखवत माऊली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी आणि संकल्पसिद्धी प्रॉडक्ट इंडिया कंपनीत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेचा अपहार करून ठेवीदारांची कोटय़वधींना फसवणूक प्रकरणातील संशयित विष्णू भागवत आणि त्याच्या साथीदारांचे अजून दुसरे प्रकरण उघड झाले आहे. मार्केटिंग अर्थात साखळी विपणन योजनांद्वारे वस्तू विक्रीपोटी अधिकची दलाली देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी वेगवेगळ्या संस्था, सोसायटी स्थापून ठेवीदारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी श्री माऊली मल्टिस्टेट सहकारी सोसायटी आणि संकल्पसिद्धी प्रॉडक्ट विरुद्ध गेल्या वर्षी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ४६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेले असून त्यांची पाच कोटी २८ लाखांहून अधिकची फसवणूक झालेली आहे.

संशयित विष्णू भागवत आणि त्याच्या साथीदारांनी संकल्पसिद्धी या वस्तूवर आधारित कंपनीच्या साखळी विपणन योजनेत पैसे गुंतविण्यास सांगितले. कंपनीची वस्तू आणि त्यापोटी जादा दलाली देण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानुसार वस्तू आणि दलाली न देता स्वत:चा फायदा करून घेतला. तक्रारदाराने संकल्पसिद्धी योजनेत गुंतवणूक केली असताना त्यांना धनादेश विष्णू भागवत संचालक असलेल्या श्री माऊली क्रेडिट सोसायटीच्या नावे दिला. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याची माहिती असताना तक्रारदाराच्या मूळ गुंतवणूक रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार करून दोन लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भागवत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ात सोसायटी, कंपन्यांच्या आठ दलालांना आतापर्यंत अटक झाली आहे. हे संशशित सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ात मुख्य संचालक आणि गुन्ह्य़ातील मुख्य संशयित विष्णू भागवतला अटक करण्यात आली. न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

संस्था, सोसायटी, कंपन्यांची यादी

संशयितांनी वेगवेगळ्या नावाने संस्था, सोसायटी, कंपन्या स्थापून वेगवेगळ्या योजना राबवून ठेवीदारांची फसवणूक केली. संशयितांनी स्थापन केलेल्या नऊ संस्था, सोसायटी आतापर्यंत तपासात उघड झाल्या आहेत. यामध्ये उज्वलम् अ‍ॅग्रो मल्टिस्टेट सहकारी सोसायटी, श्री माऊली मल्टिस्टेट सहकारी सोसायटी, ग्लोबल चेक इन्स कंपनी, ग्लोबल सिटिझन, नारायणगिरी महाराज फाऊंडेशन, संकल्पसिद्धी फर्म आणि संकल्पसिद्धी प्रॉडक्ट इंडिया, लिनी इंडस्ट्रीज आदींचा समावेश आहे.

नागरिकांनी दक्षता घ्यावी

नागरिकांनी कमी कालावधीत जादा परताव्याचे आमिष दाखवून भूलथापा देणाऱ्या तसेच विविध सराफ व्यावसायिकांकडून चालविण्यात येणाऱ्या मासिक बचत योजनांच्या परताव्याच्या आमिषास बळी पडू नये. तसेच गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित संस्था, कंपनी या शासकीय नियमाप्रमाणे काम करतात की नाही तसेच त्यांना संबंधित विभागाच्या परवानग्या आहेत की नाहीत याची खात्री करावी.

– विश्वास नांगरे (पोलीस आयुक्त, नाशिक)

परराज्यातही गुन्हा

वेगवेगळ्या योजनांच्या नावाने जादा परताव्याचे आमिष दाखवत संशयितांनी राज्यातील अनेक भागांतील नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी होत आहे. संशयितांविरुद्ध पुणे ग्रामीणचे आळे फाटा, नाशिक ग्रामीणचे जायखेडा, मुंबईतील भांडुप, हिमाचल प्रदेशातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संशयितांनी मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पिंप्री चिंचवड येथील अनेक ठेवीदारांकडून कोटय़वधी रुपये जादा परताव्याचे आमिष देऊन स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे.