19 October 2019

News Flash

महापालिका शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार

(संग्रहित छायाचित्र)

विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार

नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात जूनमध्ये होत असल्याने शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिकसाठी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली  आहे. खासगी शाळांकडून पालकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेळ्या प्रसिद्धी तंत्राचा अवलंब होत असताना महानगरपालिका शिक्षण विभागाकडूनही विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

रंग उडालेल्या भिंती, अस्वच्छ स्वच्छतागृह, मैदानाची वानवा, आवारात वाढलेले गवत, निखळलेले दरवाजे असे चित्र महापालिका शाळा म्हटल्यावर डोळ्यांसमोर उभे राहते. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेच्या शाळांनी आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असून ई लर्निग, विविध क्रीडा प्रकार, स्वसंरक्षणासह विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर अशा विविध उपक्रमांसह ज्ञानरचनावाद उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध शैक्षणिक प्रकल्प, उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

याशिवाय सामाजिक दायित्व निधीतूनही विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. या आपल्या गुणवत्तेची प्रसिद्धी जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात येऊन शिक्षण विभाग आता पालकांना प्रवेशासाठी आवाहन करत आहे. शहर परिसरात मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच उर्दू माध्यमातील प्राथमिक ९१ शाळा असून माध्यमिकच्या १३ शाळा आहेत. महापालिकेच्या १०४ शाळांमधून २७ हजार ३०० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. ही पटसंख्या वाढावी, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे.

याविषयी प्रशासन अधिकारी उदय देवरे यांनी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या स्थिर असली तरी गेल्या वर्षी काही शाळा विलीन झाल्याने त्याचा काही अंशी परिणाम विद्यार्थी संख्येवर होईल अशी भीती व्यक्त केली.

नवीन शैक्षणिक वर्षांत ज्ञानरचना वादाच्या अंमलबजावणीसाठी ९१ शाळांपैकी एका प्रमुख केंद्रासह २४ शाळांमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित गुणवत्ता गट स्थापन करण्यात येणार आहे. या गटाची सहा महिन्यांतील कामगिरी लक्षात घेता शहरातील सर्वच महापालिकेच्या शाळांमध्ये याची अंमलबजावणी होईल. तसेच कोणताही विद्यार्थी शाळाबाह्य़ राहू नये यासाठी महापालिकेने सर्वेक्षण केले असून जूनच्या पहिल्याच आठवडय़ात अनाथ, अपंग, बालभिक्षेकरीसह अन्य बालकांचे प्रवेश होतील, असा विश्वास देवरे यांनी व्यक्त केला. यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या सहकार्याने रस्त्यावरील बालभिक्षेकरी, अनाथ मुले यांचा शोध घेत त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येत असून गरज पडल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी महापालिका वसतिगृह सुरू करेल, असे देवरे यांनी सांगितले.

असा आहे ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावादात इयत्ता आणि वयाचे बंधन नाही. विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकविणार. शिक्षक मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहणार आहे. वर्गातील आसन व्यवस्था गायब होऊन समूहाने विद्यार्थी एखाद्या संकल्पनेवर, विषयावर एकत्रित चर्चा करत तो विषय समजून घेतील. त्यासाठी जूनच्या पहिल्याच आठवडय़ात शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. याबाबत पालकांच्या मनात संभ्रम असू शकतो, परंतु पारंपरिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी कमी होत असल्याने ज्ञानरचनावाद प्रभावी ठरेल.

First Published on May 9, 2019 10:09 am

Web Title: free admission process in municipal schools