प्राणवायू सुविधायुक्त खाटांची व्यवस्था; आज उद्घाटन

नाशिक : महानगरपालिकेचे सहकार्य आणि खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गरीब रुग्णांसाठी शहरात नि:शुल्क असे प्राणवायू सुविधायुक्त खाटांचा समावेश असलेले करोना केंद्र तयार करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती  शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

सिडकोतील वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बडगुजर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह आणि बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी विद्यामंदिरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे करोना केंद्र सुरू होणार आहे. सिडकोतील रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय सेवेअभावी पूर्णत: मेटाकुटीस आले आहेत. यासंदर्भात अनेक जण बडगुजर यांच्याकडे व्यथा मांडत होते. यावर उपाय म्हणून बडगुजर यांनी सिडकोवासीयांसाठी सावता नगर येथील सावरकर सभागृह आणि रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या मनपाच्या शाळेत करोना

केंद्र उभारण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे के ली होती. त्यास परवानगी मिळाली असून सुसज्ज अवस्थेतील करोना केंद्र उभारण्यात आले आहे.

सावरकर सभागृहात प्राणवायू सुविधायुक्त एकूण ६० आणि इतर १०० याप्रमाणे खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमण्यात आले आहेत. त्यासोबत मोठय़ा प्रमाणात कर्मचारी, स्वयंसेवक राहतील. किरण बिरारी, तुषार शिंदे, भूषण कुलकर्णी, छाया गाढवे, त्रिवेंद्र शिंदे या खासगी डॉक्टरांसह एकूण पाच परिचारिकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे खासगी डॉक्टरांच्या मदतीने सुरू होणारे नि:शुल्क प्राणवायू सुविधांनी युक्त खाटा असलेले रुग्णालय सर्वासाठी प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.