नाशिक : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा गांधीवादी वसंतराव हुदलीकर (९७) यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मूळचे समाजवादी कार्यकर्ते असणाऱ्या हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढय़ात सहभाग घेतला होता. १९४४ मध्ये निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे त्यांना अटक झाली होती. यावेळी त्यांच्यासमवेत मांडवगणे, आंधळे, रामभाऊ गायटे होते. मनमाड येथे गायटे यांच्याकडे समाजवादी कार्यकर्ते जमत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात हुदलीकर हे सेवादलात कार्यरत होते. स्वातंत्र्यसैनिक संघटना, हुतात्मा स्मारक, खादी ग्रामोद्योग, समर्थ बँक, देशस्थ ऋग्वेदी संस्था आदी संस्थांशी ते निगडित होते. सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. हुतात्मा स्मारकाची संपूर्ण जबाबदारी कित्येक वर्षांपासून ते सांभाळत होते. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना हुतात्मा स्मारकात अभ्यासाची व्यवस्था करून दिली.

अनेकांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन दिले. हुदलीकर यांनी आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात देहदान केले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण करताना हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढय़ाबरोबर देशातील अनेक महत्वाच्या चळवळीत सहभाग घेतल्याचे नमूद केले. खेडय़ापाडय़ातील, आदिवासी भागातील मुलांना त्यांनी हुतात्मा स्मारकात गुरूकुलाप्रमाणे सांभाळले. शहीद कुटुंबातील सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले.

महात्मा गांधी यांच्या विचारांची जोपासना करत संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खर्ची केले. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.