शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा दिल्लीत सत्कार होणार

विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक १८च्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी पुढाकार घेतला आहे. माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी कुठलीही आर्थिक गुंतवणूक न करता ‘दत्तक मैत्रीण’ हा अभिनव उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थीगळतीचे प्रमाण कमी करून दाखविले आहे.

बच्छाव यांनी दोन वर्षांपूर्वी ‘दत्तक मैत्रीण’ हा उपक्रम हाती घेतला. हेतू हाच की, वर्गात एखाद्या विशिष्ट विषयात गती असलेल्या आणि गती नसलेल्या विद्यार्थ्यांची एकमेकांशी मैत्री करून त्याचे अभ्यासाच्या दृष्टीने पालकत्व देणे. वर्गात शिकवल्यावर काही मोजके विद्यार्थी गणित, इंग्रजीसह अन्य विषयांची पटापट उत्तरे देत होती. बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी यात मागे पडत होते. त्यांना मागे ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हता. त्या वेळी ‘दत्तक मैत्रीण’ ही कल्पना सुचल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

यामुळे विद्यार्थ्यांचा इंग्रजी, मराठी, इतिहास, विज्ञान, गणितसह छंद वर्गाचा अभ्यासही पूर्ण होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागते. यंदा या उपक्रमात ‘दप्तरमुक्त अभियान’साठी चित्र, नृत्य याचा आधार घेतला आहे. शुक्रवारी विद्यार्थ्यांना वेगवेगळा विषय सुचवायचा. त्यावर विद्यार्थी शनिवारी कविता, नाटक, चित्र सादर करतात. तसेच पुढील काळात स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जाता यावे यासाठी सामान्यज्ञान विषयावर त्यांची सराव परीक्षा घेतली जात असल्याचे बच्छाव यांनी नमूद केले.

बच्छाव यांच्या अभिनव उपक्रमाची दखल नवी दिल्लीतील ‘झिरो इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशन फॉर एज्युकेशन इन्स्टेटिव्ह’ या संस्थेने  घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांच्या हस्ते त्यांचा येत्या १७ ऑगस्ट रोजी दिल्ली  येथे गौरव केला जाणार आहे.

‘दत्तक मैत्रीण’ उपक्रम

एखाद्या मुलीचे गणित कच्चे आहे आणि त्याच वर्गातील एखादी मुलगी गणितात खूप पुढे आहे. या दोघींना एकमेकींना दत्तक द्यायचे. यामध्ये जिचे गणित चांगले ती दुसऱ्या मुलीकडून गणिताच्या संकल्पना व्यवस्थित करून घेणार. वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत गणित कसे सोडविता येईल याची माहिती देणार. मुले शिक्षकांना घाबरतात, परंतु समवयस्क मैत्रीण शिकवते म्हटल्यास जिथे अडते तिथे थेट मुलींचा संवाद होतो.  यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे.