अनिकेत साठे

मित्रांकडे उरल्या केवळ आठवणी

निनाद अभ्यासी कीडा नव्हता. शाळेत तो अभ्यास करताना दिसायचा नाही. तरी प्रत्येक परीक्षेत तो अव्वल असायचा. दहावीची परीक्षाही त्यास अपवाद ठरली नाही. जे काही ठरवले ते करूनच दाखवायचे. या ईर्षेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन तो हवाई दलात गेला. केदारनाथ येथील नैसर्गिक आपत्तीप्रसंगी बचाव कार्यात त्याने मोलाची कामगिरी बजावली. त्यातही तो अव्वल राहिला. निनादचे लग्न जुलै २०१३ मध्ये झाले. लग्नासाठी त्याला केवळ तीनच दिवस सुटी मिळाली. तेव्हां त्याच्याशी झालेली आमची भेट अखेरची ठरली..

जम्मू-काश्मीर येथील हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शुक्रवारी जनसागर लोटला होता. शालेय विद्यार्थ्यांपासून ते वयोवृध्दांपर्यँत सर्व जण वीरपुत्राचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आले होते. अंत्ययात्रा ज्या मार्गावरून मार्गस्थ झाली, त्या त्या कॉलनी, इमारतींमधील नागरिक निनादला श्रध्दांजली अर्पण करत होते. या गर्दीत निनादचे शालेय जीवनातील सोबती होते. पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर वर्ग मित्रांनी निनादच्या आठवणींना उजाळा दिला.

वेगवेगळ्या जिल्ह्य़ासह आसपासच्या राज्यातून ते आले होते. त्यात बडोद्याचे मनजितसिंग अवलोड, वापीचा विमल पांचाल, मुंबई-ठाण्यातून कमाल चौधरी, तुषार चौधरी, आशिष शहा यांच्यासह बलराम आरोळे, विवेक धोंगडे आदींचा समावेश होता. औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेतील (एसपीआय) विद्यार्थी, सहकारी मित्र पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट अशा पोशाखात आले होते.

नाशिक येथील भोसला सैनिकी शाळेत निनादचे शिक्षण झाले. मित्रांनी त्याच्या स्वभाव वैशिष्ठांचे पदर उलगडले. शालेय जीवनात वैमानिक बनण्याची मनिषा निनाद बाळगून होता. अत्यंत हुशार. कोणाशीही त्याची लगेच गट्टी जमायची. इंग्रजी तुकडीतील जवळपास प्रत्येक जण त्याचा मित्र होता. हॉकी त्याचा आवडता खेळ. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत त्याने सहभागही घेतला. एनसीसीच्या एअर विंग कमांडमध्ये उत्साहात सहभागी व्हायचा. ठरवेल ते करायचे, ही इर्षां आम्हांला निनादमध्ये दिसली. हुशार असूनही नेहमी अभ्यासच, असे त्याचे सूत्र नव्हते, ही आठवण मित्रांनी सांगितली.

शाळेत तो दहावीत प्रथमस्थानी राहिला. दहावीनंतर शाळेतील सर्व मित्र वेगवेगळ्या क्षेत्राकडे गेले. शिक्षण आणि नंतर नोकरी-व्यवसाय बदलले, तरीही भ्रमणध्वनीवरील शालेय मित्रांच्या गटाने सर्वाना बांधून ठेवले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून निनाद हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाला. आघाडीवरील तळांवर त्याची अनेकदा नेमणूक झाली. तिथून त्याला फारसे बोलता यायचे नाही. जेव्हां वेळ मिळेल, तेव्हां तो आवर्जुन संपर्क साधायचा. मित्रांच्या गटांवर कधीतरी चर्चा करायचा. केदारनाथच्या नैसर्गिक आपत्तीवेळी हवाई दलाने विशेष मोहीम राबवली. त्यात निनादचाही सहभाग होता. हेलिकॉप्टरचे सारथ्य करत त्याने अनेकांचे प्राण वाचवले. वर्गमित्रांना निनादला भेटण्याचा योग जुलै २०१३ मध्ये जुळून आला. स्वत:च्या लग्नासाठी त्याला केवळ तीन दिवस सुटी मिळाली होती. तत्पुर्वी त्याने सर्वाना निमंत्रणे पाठवली. निनादचे लग्न अतिशय साधेपणाने झाले. लग्नात आमची भेट झाली. काही वेळ गप्पा मारता आल्या. ती प्रत्यक्षातील शेवटची भेट ठरेल, असे कधी वाटले नव्हते. देशसेवा हा निनादचा ध्यास होता. अखेपर्यंत तो देशासाठी धडपडत राहिला, असे सांगतानाच शहीद मित्राला अखेरचा निरोप देतांना वर्गमित्रांचे डोळे पाणावले.