नाशिक : जिल्ह्यात दुकाने, हॉटेल, मद्यालये आदींसाठी याआधी निश्चित केलेल्या वेळेचे आदेश रद्द करून शासनाच्या र्निबध शिथिलीकरण आदेशान्वये सर्व आस्थापनांसाठी गुरुवारपासून एकसमान म्हणजे सकाळी नऊ ते रात्री नऊ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनांसाठी वेळेची कोणतीही मर्यादा असणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रातील आस्थापनांसाठी पूर्वीच्याच वेळेच्या मर्यादा, अन्य नियम लागू राहणार आहेत.

टाळेबंदीचे र्निबध शिथिल करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असून काही दिवसांपूर्वी शहरातील सर्व दुकाने रात्री आठपर्यंत तर, हॉटेल आणि मद्यालये रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. करोनाच्या नियमावलीचे पालन करून हळूहळू सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. अलीकडेच शासनाने हॉटेल, मद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्यांची वेळमर्यादा वाढविण्यात आली आहे.

प्रशासनाने सकाळी सात ते सायंकाळी सात ही वेळ निश्चित केली होती. परंतु, ती गैरसोयीची असल्याने अनेक मद्यालय चालकांनी ती वाढवून देण्याची मागणी केली होती. बैठकीत या मुद्यावर चर्चा होऊन सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. शहरातील अन्य दुकानदारांना रात्री आठपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. राज्य शासनाच्या टाळेबंदी शिथिल करण्याच्या परिपत्रकाद्वारे आता आस्थापनांसाठीच्या वेळेत पुन्हा फेरबदल करण्यात आले. शासनाच्या सूचनांचा विचार करून पालकमंत्री, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून यापूर्वीचे सर्व आदेश रद्द करून सर्व आस्थापनांसाठी एकसमान सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी वेळ निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनांसाठी वेळेची कोणतीही मर्यादा असणार नसल्याचे मांढरे यांनी म्हटले आहे.