’ महापालिका आरक्षण सोडत
’ प्रभागांच्या मोडतोडीमुळे इच्छुकांच्या डोकेदुखीत वाढ

कोणाच्या प्रभागात राखीव जागेवर महिलेचे आरक्षण आले, तर कोणी वर्षभरापासून चालविलेली तयारी अडचणीत आली. बदलेल्या प्रभाग रचनेमुळे राजकीय पक्षांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला. कुठे अपेक्षित आरक्षण आल्याने, तर कुठे प्रभागातील तीन जागा सर्वसाधारण गटासाठी शिल्लक राहिल्याने काहींना नव्या दमाने लढण्याची संधी उपलब्ध झाली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आणि अनेक विद्यमान नगरसेवक व इच्छुकांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरल्याचे पाहावयास मिळाले. संधी कायम राहिल्याचा उत्साह असला तरी जुन्या प्रभागांची मोडतोड आणि नव्याने जोडल्या जाणाऱ्या भागाची चिंता त्यांच्या चेहेऱ्यावर झळकत होती. महापालिकेच्या एकूण १२२ पैकी अनुसूचित जाती प्रवर्गाचे १८, अनुसूचित जमाती ९, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) ३३ आणि सर्वसाधारण ६२ जागा राहणार आहेत. एकूण जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या असून अन्य गटांतून काही महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. त्या विजयी झाल्यास महापालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला नगरसेवकांचे संख्याबळ अधिक राहू शकते.

चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत महाकवी कालिदास कला मंदिरात काढण्यात आली. सर्वच नगरसेवकांचे पुढील राजकीय भवितव्य या सोडतीवर निश्चित होणार होते. त्यामुळे मोठी गर्दी होईल ही शक्यता गृहीत धरून पालिकेने केलेली तयारी व्यर्थ ठरली. काही विद्यमान नगरसेवक व इच्छुक आणि समर्थक वगळता बडय़ा नेत्यांनी याकडे पाठ फिरविली. प्रभाग क्रमांक १५ आणि १९ हे प्रभाग तीन सदस्यीय, तर उर्वरित २९ प्रभाग चार सदस्यीय राहतील. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रवर्गनिहाय सरळ आणि जिथे गरज भासेल तिथे चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वासमक्ष चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. अनुसूचित जातीसाठी आरक्षित १८ पैकी ९ जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातीच्या नऊ पैकी पाच, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या ३३ पैकी १७ आणि सर्वसाधारण गटातील ६२ पैकी ३० जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. सोडत जाहीर होऊ लागली, तशी सभागृहातील चलबिचल वाढली. समर्थकांसह आलेल्या काही विद्यमान नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला. बदललेल्या आरक्षणाचा विद्यमान १४ ते १५ नगरसेवकांना फटका बसणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती अशा दिग्गजांना पुन्हा संधी मिळणार आहे. तथापि, काही प्रभागांचा विस्तार अतिशय मोठा झाला आहे. त्यामुळे पूर्वीचे दोन ते तीन प्रभाग जोडले गेले असून एकाच पक्षाचे अनेक उमेदवार समोरासमोर उभे ठाकणार आहेत. कुठे राखीव जागेवर महिला, तर कुठे सर्वसाधारणसाठी प्रभाग खुला झाल्याचे पाहून काहींनी सभागृहातून काढता पाय घेतला.

चार सदस्यीय पद्धतीमुळे प्रभागांचा आकार विस्तारला आहे. सोडतीच्या ठिकाणी प्रभागांचा एकत्रित आणि प्रभागनिहाय स्वतंत्र नकाशे लावण्यात आले. याद्वारे प्रभागाची व्याप्ती व रचना कशी असेल याचा अंदाज नगरसेवक घेत होते. काही विद्यमान नगरसेवकांसह पालिका निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यासाठी इच्छुक असणारे सोडतीनंतर जागा शिल्लक नसल्याने नाराज झाले.

असे आहे प्रभागनिहाय आरक्षण

(अ, ब, क आणि ड या क्रमाने)

प्रभाग क्रमांक १ – अनु. जाती. महिला, अनु. जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ – अनू. जाती. महिला, अनु. जमाती, ना. मा. प्र., प्रभाग क्रमांक ३ – ना. मा. प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ – अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, ना. मा. प्र., सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ – ना. मा. प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ६ – अनु. जमाती, ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ – ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ – अनू. जाती महिला, अनु. जमाती महिला, ना.मा.प्र., सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ – अनु. जाती, ना.मा. प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १० – ना.मा.प्र. सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ११ – अनु. जाती महिला, अनु. जमाती, ना.मा.प्र. सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १२ – अनु. जाती महिला, ना. मा.प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १३ – ना.मा.प्र. महिला, ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १४ – अनु. जाती महिला, ना.मा.प्र., सर्वसाधारण, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १५ –  ना.मा.प्र, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १६ – अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, ना.मा.प्र., सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १७ – अनु. जाती, ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १८ – अनु. जाती, ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १९ – अनु. जाती, ना.म.प्र. महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २० – अनु. जाती, ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २१ – अनु. जाती, ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २२ – अनु. जाती, ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २३ – अनु. जमाती महिला, ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २४ – ना.मा.प्र. महिला, ना.मा.प्र, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २५ – ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २६ – ना.मा.प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २७ – अनु. जाती, अनु. जमाती, ना.मा.प्र महिला, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक २८ – ना. मा. प्र., सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २९ – ना. मा. प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३० – अनु. जाती, ना. मा. प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३१ – अनु. जाती, ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण.