21 November 2019

News Flash

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरा भाग भरण्यास लवकरच सुरुवात

६० महाविद्यालयात २३ हजारांहून अधिक जागा

६० महाविद्यालयात २३ हजारांहून अधिक जागा

महापालिका हद्दीतील ६० महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या एकूण २३ हजारहून अधिक जागेच्या प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग भरण्यास आता सुरुवात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश प्रक्रियेचा पहिला भाग भरलेला नाही, त्यांना काही दिवस तो भरण्याची मुभा आहे. महापालिका हद्दीतील जागांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे ९५२० विज्ञान शाखेच्या, तर ७७६० वाणिज्य, ४८०० कला आणि ११४० व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. महापालिका हद्द वगळून ग्रामीण भागात ११ वीसाठी सुमारे  ५१ हजार ८०० जागा उपलब्ध आहेत.

शिक्षण विभागातर्फे ११ वीसाठी केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. गतवर्षी ही प्रक्रिया बरीच लांबली होती. ती पूर्णत्वास नेताना शिक्षण विभागाची दमछाक झाली. ही प्रक्रिया नियोजनपूर्वक पार पाडण्यासाठी विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधला गेला. शहरातील बहुतांश विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने प्रवेश प्रक्रियेतील पहिला भाग भरलेला आहे. महापालिका हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांना ही व्यवस्था करण्यात आली. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील काही दिवस पहिला भाग भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

ऑनलाइन प्रवेशात काही अडचणी उद्भवल्यास काही महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन केंद्रांची सुविधा करण्यात आली आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग ऑनलाइन भरण्याची सुविधा खुली होईल. आठ ते दहा दिवस त्यासाठी कालावधी दिला जाईल. या कालावधीत ज्यांनी पहिला भाग भरलेला नाही, त्यांना तो भरता येईल. त्याची छाननी करून त्यांना लगेचच दुसरा भाग भरावा लागणार आहे. त्यापुढील दोन दिवसात संकलित झालेल्या माहितीवर शिक्षण विभागाकडून प्रक्रिया केली जाईल. विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे ऑनलाइन क्रमवारी जाहीर केली जाईल. या यादीत विद्यार्थ्यांना काही त्रुटी आढळल्यास त्यांना तक्रार करण्यासाठी एक-दोन दिवसांची मुदत मिळेल. हे सोपस्कार पार पडल्यानंतर साधारणत: १५ ते १८ दिवसांनी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नाशिकचा विचार केल्यास महापालिका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये कला (४८००), विज्ञान (९४४०), वाणिज्य (७७६०) आणि संगणक (५६०) साठी २२ हजार ५६० जागा उपलब्ध आहेत. ग्रामीणमध्ये कला (२६६४०), विज्ञान (१७०८०), वाणिज्य (६६००) आणि संगणक (१४८०) अशा ५१ हजार ८०० जागा उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणीची संधी

राज्य शिक्षण मंडळाचा १० वीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर सोमवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. गुण पडताळणीसाठी १९ जूनपर्यंत, तर छायांकित प्रतीसाठी २९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे बंधनकारक आहे. ही प्रत मिळाल्यानंतर पाच दिवसात विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावा. तसेच दहावीत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी, गुणसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट २०१९ आणि मार्च २०२० अशा दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.

First Published on June 12, 2019 1:07 am

Web Title: fyjc online admission 2019
Just Now!
X