कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०१६-१७च्या कुसुमाग्रज अभ्यासवृत्तीसाठी गजानन तायडे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी दिली. एक लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती सर्जनशील साहित्यनिर्मितीसाठी वर्षांतून एकदा देण्यात येते. या अभ्यासवृत्तीसाठी राज्याच्या विविध भागांतून अनेक प्रस्ताव आले होते. त्यातून जयंत पवार, सतीश तांबे आणि मोनिका गजेन्द्रगडकर या समीक्षक व साहित्यिकांच्या निवड समितीने एकमताने तायडे यांची निवड केली. यापूर्वी कै. मुरलीधर खैरनार, अवधूत डोंगरे व प्रणव सखदेव यांची या अभ्यासवृत्तीसाठी निवड झाली होती. प्रतिष्ठानच्यावतीने अभ्यासवृत्ती समिती प्रमुख प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर, समिती सदस्य लोकेश शेवडे, हेमंत टकले व विलास लोणारी यांनी समितीस साहाय्य केले.