गणेशोत्सवविषयी भालेकर मैदान तिढय़ावर पोलिसांचे मत; जागेसाठी मंडळांचा गणेशोत्सवावर बहिष्काराचा इशारा

गणेशोत्सवासाठी बी. डी. भालेकर मैदानावरील जागा उपलब्ध करण्यास महापालिकेने नकार दिला असला तरी उपरोक्त जागेवर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्यावर सात ते आठ मंडळे ठाम आहेत. पालिकेने आठकाठी आणल्यास गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे. यावर भाष्य करताना पारंपरिक व्यवस्थेत परस्पर बदल करता येत नसल्याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष वेधले आहे.

भालेकर मैदानावर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, एचएएल, बॉश, महिंद्रा सोना, श्री राजे छत्रपती, श्री नरहरीचा राजा सामाजिक संस्था, श्रीगणेश मूकबधिर आदी मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. शालिमार चौकालगतचे हे मैदान गणेश भक्तांसाठी सोयीचे ठरते. एकाच ठिकाणी अनेक मंडळांची आरास पाहावयास मिळत असल्याने नागरिकांची ही सोय होत असते. यंदा  उपरोक्त मंडळांनी गणेशोत्सवासाठी या मैदानाची मागितलेली जागा देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. भालेकर मैदानावर वाहनतळाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याची मुदत ३० नोव्हेंबपर्यंत आहे. यामुळे ही जागा देता येणार नसल्याचे प्रशासनाने लेखी पत्राद्वारे सूचित केले. पर्याय म्हणून त्र्यंबक रस्त्यावरील महापालिकेच्या इदगाह मैदानाची जागा मंडळांना सुचविण्यात आली आहे. या जागेची मंडळांनी मागणी केल्यास अटी-शर्तीने ती उपलब्ध करून दिली जाईल, असे पालिकेने म्हटले आहे.

पालिका प्रशासनाने जागा देण्यास नकार दिला असला तरी त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा मोडणार नसल्याचे मंडळांचे पदाधिकारी गणेश बर्वे यांनी सांगितले. जागेच्या तिढय़ावर भाजपने तोडगा काढावा. दहा दिवसांसाठी वाहनतळाचे काम बंद ठेवणे अशक्य नाही. पालिकेने आडकाठीचे धोरण कायम ठेवल्यास सर्व मंडळे यंदाच्या गणेशोत्सवावर बहिष्कार टाकतील आणि त्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची राहणार असल्याचा इशारा गणेश मंडळांनी दिला आहे.

रस्त्यावर मंडप उभारणीसाठी पालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीने गणेश मंडळांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने आयोजिलेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच बैठकीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. महापौर दरवर्षीप्रमाणे स्वतंत्र बैठक घेणार आहेत. त्यात जाचक नियमावली, भालेकर मैदानावरील जागा या वादग्रस्त मुद्यांवर तोडगा काढला जाईल, अशी आशा काही मंडळे बाळगून आहेत. पारंपरिक व्यवस्थेत परस्पर बदल करता येत नसल्याचा शासन आदेश आहे. धार्मिक सणोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरे होतात. त्यासंबंधीचा परस्पर काही निर्णय झाल्यास शासकीय आदेशाची जाणीव पालिकेला करून देण्याची तयारी पोलीस यंत्रणेने केली आहे.

भाजपची कोंडी

विरोधी पक्षांनी गणेश मंडळांच्या पाठीशी उभे राहून एकाच दगडात पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप यांना गारद करण्याची रणनीती ठेवली आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे गणेश मंडळांना काय उत्तर द्यायचे, या तिढय़ावर तोडगा काढताना सत्ताधाऱ्यांचा कस लागणार आहे. मागील काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजप आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आयुक्तांच्या विविध निर्णयांनी सत्ताधाऱ्यांना दणका बसला. यामुळे भाजपही आयुक्तांना अडचणीत आणण्याची संधी सोडत नाही. गणेशोत्सवाशी संबंधित वादात तेच धोरण सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी ठेवले आहे.

पोलीस यंत्रणा अनभिज्ञ

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापलिकेने बी. डी. भालेकर मैदानाऐवजी इदगाह मैदानावरील जागा सुचविताना पोलिसांनाही विश्वासात घेतलेले नाही. इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांचे धार्मिक स्थळ आहे. तिथे गणेशोत्सव साजरा करण्यास खुद्द गणेश मंडळेही तयार नाहीत. महापालिकेने इदगाह मैदानाची जागा देण्याविषयी  लेखी माहिती मिळाल्यास पोलीस यंत्रणा मैदानाचा आढावा घेऊन आपले म्हणणे स्पष्ट करणार आहे. मैदानावरील किती, कोणती जागा गणेशोत्सवासाठी दिली जाईल, वाहन तळाची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदींचा विचार केला जाणार आहे.