एक लाख १६ हजारहून अधिक मूर्ती, ११४ टन निर्माल्याचे संकलन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरणस्नेही पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल उत्तरोत्तर वाढत असून विसर्जनाच्या दिवशी त्याची प्रचिती आली. महापालिकेने पर्यावरणवादी संघटनांच्या सहकार्याने राबविलेल्या मूर्ती आणि निर्माल्य संकलन उपक्रमास गणेशभक्तांनी प्रतिसाद दिल्यामुळे तब्बल एक लाख १६ हजार ८९६ मूर्ती आणि ११४.४५ टन निर्माल्य संकलीत झाले. यंदा मूर्ती संकलनात घट झाली आहे. त्यामागे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे घरी विसर्जन करता यावे म्हणून पालिकेने मोफत स्वरुपात उपलब्ध केलेली ४.२ मेट्रिक टन अमोनिअम बायोकॉबरेनेट पावडर हे कारण आहे.

जल प्रदुषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन अथवा दान करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिका, पर्यावरणवादी संस्था यांच्याकडून करण्यात आले होते. महापालिकेने मूर्ती, निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी खास व्यवस्था केली. विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील सहा विभागात मूर्ती, निर्माल्य संकलनाच्या व्यवस्थेबरोबर कृत्रिम तलावांची व्यवस्था केली. हा उपक्रम दरवर्षी नियोजनपूर्वक राबविला जात असून त्यास गणेशभक्तांचा प्रतिसाद लाभत आहे. यंदा त्या जोडीला पालिकेने अमोनिअम बायोकॉबरेनेट पावडरचे मोफत वितरण केले. या पावडरच्या पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरीसचे विघटन होते. भक्तांनी पालिकेच्या विभागीय कार्यालयातून मोठय़ा प्रमाणात ही पावडर नेली. दुसरीकडे मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यास जल प्रदुषण होऊ शकते. ठिकठिकाणी भक्त जनजागृती करुन भाविकांना मूर्ती दान करण्याची विनंती करत होते. या उपक्रमास सर्वाधिक प्रतिसाद पंचवटी विभागात मिळाला. या विभागात ३८ हजार ५५० मूर्ती, तर १५ टन निर्माल्य संकलित झाले. नाशिक पूर्व विभागात सात हजार १०४ मूर्ती, आठ टन निर्माल्य, नाशिक पश्चिम विभागात १३ हजार ४१९ मूर्ती आणि नऊ टन निर्माल्य, नाशिकरोड विभागात सात हजार १५८ मूर्ती आणि १५.३२ टन निर्माल्य, सातपूर विभागात ३७ हजार ५२१ मूर्ती आणि २८.२८ टन निर्माल्य, नवीन नाशिक विभागात १३ हजार १४४ मूर्ती तर १३.७८ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले. संपूर्ण शहरात एकूण एक लाख १६ हजार ८९६ मूर्तीचे संकलन तर ११४.४५ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले.

या कामात विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवून हातभार लावला. नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर धबधब्याजवळ ‘निर्माल्यातून फुलाकडे’ उपक्रम राबविला. यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान करण्याची विनंती करण्यात आली. निर्माल्यापासून खत कसे तयार केले जाते याची माहिती क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी दिली. या स्वरुपाचा उपक्रम विद्यार्थी कृती समितीने गोदा पार्क परिसरात राबविला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion in maharashtra 2018
First published on: 25-09-2018 at 01:06 IST