ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

शहरातील मुख्य गणेश मिरवणुकीत आजवर रुळलेला डीजेचा दणदणाट आणि गुलालाची उधळण या समीकरणाला दूर सारत गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाला पुढील वर्षी लवकर या, अशी साद घालत निरोप दिला. सुमारे १३ तास चाललेल्या या मिरवणुकीची आकर्षक पुष्प सजावट अन् नेत्रदीपक रोषणाईने सजलेल्या गणेशमूर्ती, पारंपरिक पेहरावात सहभागी झालेली ढोल पथके, हेल्मेट परिधान करत पथकाने केलेली जनजागृती, बहुतांश मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला दिलेले प्राधान्य, मर्दानी खेळ ही वैशिष्टय़े ठरली.

वाकडी बारव येथे दुपारी बाराच्या सुमारास पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी आपले ढोल-ताशा वाजविण्याचे आणि नृत्याचे कौशल्य दाखविले.

नेहमीच्या तुलनेत तीन ते चार तास आधी  मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक लवकर काढण्यात येऊनही दोन मंडळांमधील अंतर आणि पथकांचे ठिकठिकाणी अधिक वेळ रेंगाळणे यामुळे मिरवणूक लवकर सुरू करण्याचा उद्देश फारसा साध्य झाला नाही. प्रमुख चौकात, स्वागत कक्षासमोर मंडळे अधिक रेंगाळली. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने केलेल्या चोख नियोजनाला गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने यंदा नवीन पायंडा पाडण्यात यश मिळाले. बहुतांश मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जनास प्राधान्य दिल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांनी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. वेगवेगळ्या ढोल पथकांमध्ये मुलांबरोबर मुलींचा लक्षणीय सहभाग राहिला. काही पथकात परदेशी वादकही सहभागी झाले. महापालिकेच्या गणपतीनंतर मान होता तो, रविवार कारंजा मित्र मंडळाचा. गुलालवाडी मित्र मंडळाच्या ढोल पथकांमध्ये युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला. बालगोपाळांचे लेझिम पथक दरवर्षीप्रमाणे लक्षवेधी राहिले.

यंदा मिरवणुकीत सूर्यप्रकाश नवप्रकाश आदी मंडळांतर्फे प्रकाशझोत सोडण्यात आल्यामुळे अंधारात त्या गणेशमूर्ती डोळ्यांचे पारणे फेडत होत्या. या आकर्षक गणरायांना भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांची चढाओढ सुरू होती.

नाशिकचा राजा मित्र मंडळाने हेल्मेट जनजागृतीवर प्रबोधन केले. अनेक मंडळांनी गुलालाऐवजी फुलांचा वापर केला. मुंबई नाका मित्र मंडळाने कालिया मर्दनचा पुष्प सजावटीने देखावा साकारला. शिवसेना युवक मित्र मंडळाच्या गरुडावर आरूढ गणेशाने सर्वाचे लक्ष वेधले. काही मंडळांच्या पथकांनी चित्तथरारक मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. दरम्यान, शहरातील नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड, सातपूर, अंबड, इतर भागातही विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागातही असाच उत्साह दिसून आला.

युवतींच्या चित्रणावरून वाद

ढोल वादनात युवकांबरोबर युवती मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. काही टवाळखोरांनी वादनात रमलेल्या युवतींचे भ्रमणध्वनीत छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला. पथकांच्या समन्वयकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर संबंधितांनी त्यांना जाब विचारला. काही ठिकाणी युवतींनी टारगटांना फैलावर घेतले. अशा चित्रणावरून अनेक ठिकाणी वाद झडले. मिरवणूक पाहण्यास भक्तांची अलोट गर्दी लोटली होती. या संधीचा फायदा चोरटय़ांनी घेतला. गर्दीत अनेकांचे भ्रमणध्वनी चोरीला गेले. लंपास झालेल्या भ्रमणध्वनीची तक्रार देण्यास गेलेल्या अनेकांना ते गर्दीत हरविल्याची तक्रार द्यावी लागली. चोरीच्या गुन्ह्य़ांची संख्या वाढू नये म्हणून पोलिसांनी ही दक्षता घेतल्याचे सांगितले जात आहे.

तपोवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

तपोवन परिसरात भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या स्वागत कक्षासमोर काही मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. त्याची दखल घेऊन सात ते आठ कार्यकर्त्यांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रफितीत काही कार्यकर्ते हाणामारी करत असल्याचे दिसत असून संशयितांचा छडा लावला जाईल, असे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. उपरोक्त घटनेशी आपला संबंध नसल्याचे सानप यांनी म्हटले आहे.

पोलिसांचे नियोजन

राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या असंख्य स्वागत कक्षांमुळे मिरवणूक रेंगाळते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी समविचारी, एकाच पक्षातील वेगवेगळ्या शाखा यांना एकच स्वागत कक्ष ठेवण्याची सूचना केली होती. यामुळे त्यांची संख्या मर्यादित राहिली. तसेच त्यांना जागा निश्चित करून आकारही सीमित करून दिला गेला.