‘सामाजिक ऐक्य’च्या भावनेतून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव कालानुरूप बदलला. मंडपाची भव्य-दिव्यता, आकर्षक विद्युत रोषणाईचा साज आणि देखाव्यांच्या संगतीत गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवत असल्याची खंत अनेकदा व्यक्त होते. गणेशोत्सवावर यंदा दुष्काळाचे सावट असतांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यावरील या संकटाकडे केवळ ‘बघ्याची’ भूमिका घेतल्याचे दिसते. काही मंडळांचा अपवाद वगळता बहुतांश गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसारखा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले नसल्याचे अधोरेखीत होत आहे. या एकंदर स्थितीत गणेशोत्सवाशी थेट संबंध नसलेल्या रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाने स्वयंस्फुर्तीने एक लाखाचा निधी संकलीत करत तो ‘नाम फाऊंडेशन’कडे सुपूर्द करण्याची तयारी चालवली आहे. संघाचा हा उपक्रम गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मंडळांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
शहर परिसरात यंदा गणेशोत्सव कालावधीत कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी येत असल्याने गर्दीचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी पालिका तसेच पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांवर काही र्निबध घातले. काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवत मंडप उभारणी सुरू असतांना काहींनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. मात्र, उत्सवातील साधेपणा जपतांना मूळ उद्देशाला तिलांजली देण्यात आली आहे. भद्रकाली परिसरातील विनायक पांडे यांच्या शिवसेवा युवक मंडळाच्यावतीने नेहमीप्रमाणे विद्युत रोषणाईवर लक्ष केंद्रीत केले. आवाजाचा दणदणाट आणि विद्युत रोषणाई यांची जुगलबंदी स्थानिकांच्या कानाडे पडदे फाडणारी ठरत असली तरी मंडळाला त्याच्याशी काही घेणे नाही. धार्मिक कार्यक्रमांसह अन्य काही स्पर्धाचे नियोजन करणाऱ्या मंडळाला दुष्काळग्रस्तांचा विसर पडला. या संदर्भात उत्सव काळात कार्यकारिणीशी चर्चा करून पुढे काही निर्णय घेता येईल, असे मंडळाचे मार्गदर्शक माजी महापौर विनायक पांडे यांनी सांगितले. म्हणजे, इतर विषयांवर तातडीने निर्णय आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ, अशी ही भूमिका आहे.
प्रशासनाने र्निबध घातल्याने जुन्या नाशिकमधील रोकडोबा गणेश मंडळ यंदा मंडपही टाकणार नसल्याचे बाळाभाऊ खैरे यांनी सांगितले. गोदा प्रदुषण होणार नाही अशा दृष्टिने मूर्तीची निवड करण्यात येणार आहे. कोणताही देखावा, विद्युत रोषणाई राहणार नाही. मात्र, उत्सव काळात जमा होणाऱ्या निधीच्या वापराविषयी अद्याप कार्यकारिणीत कुठलीच चर्चा झाली नसल्याचे खैरे यांनी सांगितले. मुंबई नाका येथील युवक मित्र मंडळाने सिंहस्थामुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. मात्र यातून जमा होणारा निधी किंवा लोकवर्गणीचा वापर दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून करायचा किंवा नाही याबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे मंडळाचे समन्वयक माजी आमदार वसंत गीते यांनी सांगितले.
सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द असलेल्या रविवार कारंजा मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी देशातील प्रसिध्द स्थळांचा देखावा साकारला जातो. यंदा सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, मंडपाचा लहान आकार पाहता रामायणातील अशोक वाटिका आणि लंका दहनाचा देखावा सादर करण्यात येणार आहे. तसेच मंडळ सिंहस्थात फळांचे वाटप, तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत आहे. तिसऱ्या पर्वणीसाठी ही सेवा खंडित करत यातील काही रक्कम तसेच मिरवणुकीचा खर्चाची काही रक्कम मदत म्हणुन दुष्काळग्रस्तांना दिली जाईल. तसेच या निधीला जोड मिळावी यासाठी गणेशोत्सव काळात ११ दिवस आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करा, असे भाविकांना आवाहन करण्यात येणार आहे. उत्सवानंतर जमा झालेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले. दंडे हनुमान गणेश मंडळाने रोकडोबाच्या पाऊलावर पाऊल ठेवत उत्सवाचे नियोजन केले आहे. उत्सव कालावधीत काही स्पर्धा, कार्यक्रम होतील त्यातून जी रक्कम शिल्लक राहील ती सर्वसंमतीने दुष्काळग्रस्तांना दिली जाईल असे गजानन शेलार यांनी सांगितले.
या घडामोडीत रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंस्फुर्तीने घेतलेल्या पुढाकाराकडे पाहणे महत्वाचे ठरेल. संघाचा गणेशोत्सवाशी तसा कोणताही संबंध नाही. दुष्काळामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी वर्गाला धीर देण्यासाठी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याकरीता लोकचळवळ उभारण्याची गरज व्यक्त केली. त्यास नाशिकमधून पहिला प्रतिसाद रचना विद्यालय माजी विद्यार्थी संघाने दिला. या संदर्भात सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर प्रत्येकाकडून स्वेच्छेने निधी संकलनाचे काम सुरू झाल्याचे संघाचे अध्यक्ष कौस्तुभ मेहता यांनी सांगितले. विलास बर्वे, वसुधा फाळके, सुमीत खिवंसरा, संदीप लुणावत, राहुल भावे, संकेत आहेर आदी सदस्यांच्या प्रयत्नामुळे सहा ते सात दिवसात एक लाखाची रक्कम जमा झाली आहे. या उपक्रमास शाळेच्या १९९१ सालातील विद्यार्थ्यांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिला. त्यांनी ६० हजार रुपये मदत म्हणून दिले. किमान २५० ते कमाल सहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम सदस्यांनी शेतकऱ्यांनी मदतीसाठी दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवस निधी संकलीत करून जमणारी संपूर्ण रक्कम नाम फाऊंडेशनला दिली जाईल, असे संघाच्या पदाधिकाऱ्यानी म्हटले आहे.