देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची संकल्पना 

कधी अनिष्ट सामाजिक प्रथांविरोधात आसूड तर कधी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी अनोख्या शैलीत देखावे तयार करणारे मंडळ म्हणून शहरातील सुंदरनारायण मित्रमंडळाची ओळख आहे. भपकेबाजपणाच्या आहारी न जाता गणेशोत्सवातील मूळ हेतूची प्रामाणिक जोपासना करण्याचे काम मंडळ करीत आहे. देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्याच्या संकल्पनेला मंडळ दरवर्षी मूर्त रूप देते. अन्नाची नासाडी करू नका, हा संदेश यंदा मंडळाने देखाव्यातून दिला आहे.

१९८५ मध्ये स्थापन झालेल्या सुंदर नारायण मंडळाने आपल्या आजवरच्या वाटचालीत दरवर्षी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून गणेशभक्तांना त्या त्या विषयांचे महत्त्व पटवून दिले जाते. सामाजिक देखावे उभारण्याचे काम स्थानिक कलाकारांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तसेच विसर्जन मिरवणुकीमुळे गणेशभक्तांना होणाऱ्या अडचणींची दखल घेतली जाते. मिरवणुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रदूषण यामुळे मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढली जात नाही.

लग्न सोहळे किंवा इतर कार्यक्रमांप्रसंगी होणारी अन्नाची नासाडी रोखण्याविषयी मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात देखावा केला आहे. लग्नात अक्षदांऐवजी फुलांचा वापर करावा, बुफे किंवा भोजनावळीत अन्न वाया जाणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, याविषयी आवाहन केले आहे. आजही देशात कित्येक जणांना दोन वेळचे अन्नही मिळत नाही. वाचविलेले अन्नधान्य संबंधितांपर्यंत पोहचल्यास त्यांच्या जेवणाची व्यवस्था होईल, हे दर्शविण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.

मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा संतोष गवारे यांच्याकडे असून भाऊ सोनार, अनिल देवकर, दादा हिरे, नरेंद्र राजोळे, पप्पू आणि राजेंद्र थोरात आदी कार्यकर्ते नियोजनाची बाजू पाहात आहेत. राज्यातील पूरग्रस्तांसाठी ११ हजार रुपयांचा मदत निधी मंडळातर्फे सरकारला देण्यात येणार आहे.

मंडळाचे वैविध्यपूर्ण देखावे

समाजातील वाईट प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी मंडळाने आजवर वैविध्यपूर्ण देखावे साकारले. सामाजिक प्रबोधनाचे काम नेटाने केले. महागाई, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, घोटाळे, लोकसंख्यावाढ, बेरोजगारी, स्त्रीभ्रूण हत्या, मुलींची घटती संख्या, महिलांच्या विविध समस्या, वंचित घटकांचे प्रश्न, बालकामगार, बालविवाह, पर्यावरण संवर्धन, हवामान बदल, एचआयव्ही एड्स, नेत्रदान, रक्तदान अवयवदान यासारख्या विषयांवर मंडळाने देखाव्यातून लक्ष वेधले