23 November 2017

News Flash

एकच भाषा, ढोल ताशा!

पाऊस नसल्याने मिरवणूक बघण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: September 7, 2017 2:13 AM

नाशिक शहरातील मुख्य मिरवणूक.

ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत नाशिक शहरासह ग्रामीण भागात आपल्या लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या. अशी साद घालत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. जवळपास १२ तास चाललेल्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत डीजेपासून मुक्तता, पारंपरिक वाद्यांचा वापर, नेत्रदीपक रोषणाईने सजविलेल्या गणेश मूर्ती, पर्यावरणस्नेही देखावे ही वैशिष्टय़े ठरली. दरम्यान, चेहेडी व मुंगसरा येथे विसर्जन करताना पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला.

वाकडी बारव येथे दुपारी एक वाजता महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते महापालिकेच्या गणपतीची आरती झाल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली. पालकमंत्री गिरीश महाजन, आ. बाळासाहेब सानप, आ. सीमा हिरे व इतर लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. लेझीमच्या तालावर ताल धरण्याचा मोह पालकमंत्र्यांना टाळता आला नाही. मिरवणुकीला लवकर सुरुवात झाली तरी ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतांनी ती रेंगाळली. परिणामी, मूळ उद्देशच सफल झाला नाही.

पाऊस नसल्याने मिरवणूक बघण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. महापालिकेने यंदा खास ढोल-पथक मागविले होते. ढोलच्या तालावर सर्वानी ठेका धरला. त्यानंतर मान होता तो, रविवार कारंजा मित्र मंडळाचा. या मंडळाने फुलांची सजावट केली होती. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे चांदीची गणेशमूर्ती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. गुलालवाडी मित्र मंडळाच्या ढोल पथकांत युवती व महिलांचा लक्षणिय सहभाग होता. जमिनीवर ढोल रचून त्यावर उभे राहत वादकांनी आपली कला सादर केली. बालगोपाळांचे लेझिम पथक नेहमीचे आकर्षण ठरले.

सूर्यप्रकाश नवप्रकाश, साक्षी गणेश आदी मंडळांनी प्रकाशझोत सोडल्यामुळे संबंधितांच्या मूर्ती विलोभनीय दिसत होत्या. या आकर्षक गणरायांना भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांची चढाओढ सुरू होती. बहुतांश मंडळांच्या ढोल पथकांमध्ये युवकांच्या बरोबरीने युवतींचा सहभाग होता. पांढऱ्या पेहेरावात भगवा फेटा व शेला घेऊन सहभागी झालेल्यांनी भगव्या झेंडय़ांद्वारे नृत्य सादर केले. काही मंडळांच्या मिरवणुकीत मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. मिरवणूक रेंगाळू नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली असली तरी ठिकठिकाणी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांमार्फत होणाऱ्या स्वागताने त्यास अपेक्षित यश मिळाले नाही. स्वागत कमानीसमोर मंडळांतर्फे नाचण्यात बराच वेळ घालविला जात असल्याने काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

मिरवणुकीत एकूण १७ मंडळे सहभागी झाली. राजकीय दबाव टाकून काहींनी पुढील क्रमांक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांचा प्रभाव असलेल्या दंडे हनुमान मित्र मंडळाने पोलिसांचा दबाव झुगारून मिरवणुकीत डीजे आणला. त्याचा दणदणाट मात्र त्यांना करता आला नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री बारा वाजता वाद्ये वाजविण्यास पोलिसांनी प्रतिबंध केल्यावर मिरवणुकीचा वेग वाढला. किरकोळ अपवाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडली.

वाद्ये बंद झाल्यामुळे गणेश मंडळांनी शक्य तितक्या लवकर विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. रात्री दीड वाजता अखेरच्या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रत्येक मंडळासमवेत रायफलधारी जवानही तैनात होते. नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड, सातपूर, अंबड इतर भागातही वाजतगाजत व विधिवत पूजन करून गणेशविसर्जन करण्यात आले.

ग्रामीण भागातही असाच उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. मनमाड शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री नीलमणीची खास पुणेरी थाटात संस्कृती व परंपरेचे जतन करत निघालेली पालखी, सर्वात जुन्या आझाद गणेश मंडळासह युवक क्रांती गणेश मंडळ व अनेक मंडळांच्या झांज पथकासह निघालेल्या मिरवणुका वैशिष्टय़ ठरले.

दोन युवकांचा मृत्यू

गणेशविसर्जन करताना दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. चेहेडी येथे दारणा नदीच्या पात्रात विसर्जनासाठी आसपासच्या भागातील भाविकांची गर्दी झाली होती. बनकर मळ्यात वास्तव्यास असलेला कैलास किशोर सोनार (२३) हा मित्रांसमवेत आला होता. दारणा नदीच्या पात्रात मूर्ती घेऊन जात असताना तो भोवऱ्यात सापडला आणि बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु कैलासचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यानच्या काळात अग्निशमन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर कैलासचा मृतदेह हाती लागला. दुसरी घटना मुंगसरे परिसरात घडली. विसर्जन करताना गणेश मराळे (१८) याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विसर्जना वेळी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन आपत्तीव्यवस्थापन विभागाने आधीच केले होते. पावसामुळे बहुतांश नद्या, नाल्यांसह तलावांमध्ये पाणी पातळी अधिक आहे.

First Published on September 7, 2017 2:13 am

Web Title: ganesh visarjan 2017 ganpati visarjan in nashik