ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन

सर्वोच्च न्यायालय व पोलीस यांच्या प्रयत्नामुळे डीजे मुक्त गणेशोत्सव संकल्पना प्रत्यक्षात यावी यासाठी प्रशासनासह सर्वानी प्रयत्न केले. तथापि, मुख्य मिरवणुकीसह शहरात इतरत्र डीजेचा काही अंशी दणदणाट झाल्याचे पाहावयास मिळाले. डीजेचा वापर करीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या पाच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून शहरात डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत न्यायालयाचा आदेश, त्याची अंमलबजावणी, ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई याबाबत मार्गदर्शन केले. साधारणत दोन ते तीन बैठका घेऊन मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शंकाचे समाधान करण्यात आले. या प्रयत्नाला मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवास सुरुवात होत असताना सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनीचे मापन करण्यासाठी यंत्र उपलब्ध करण्यात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रयत्नांमुळे गणेशोत्सव ध्वनीच्या विहित निकषांचे पालन करून साजरा झाल्याचे पाहावयास मिळाले. गणेश विसर्जनाच्या दिवशी ही परंपरा कायम राखली जाईल अशी अपेक्षा होती. तथापि, काही मंडळे आणि सत्ताधारी भाजपने डीजेचा वापर करीत त्यास छेद दिला. मंगळवारी शहर परिसरात सार्वजनिक गणेश मंडळानी विसर्जनानिमित्त बाप्पाची मिरवणूक काढली. त्यासाठी प्रथमच बहुसंख्य मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. काही मंडळांनी मात्र डीजेचा वापर करत कर्णकर्कश आवाज घुमविला. डीजेचा वापर करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य गणेश मंडळे पंचवटी भागातील होती.

शहराच्या मुख्य मिरवणुकीत नगरसेवक गजानन शेलार यांच्याशी संबंधित दंडे हनुमान मित्र मंडळाने डीजेचा वापर केला.

मिरवणुकीतील उर्वरित मंडळांनी ढोल-ताशाचा वापर करण्यास प्राधान्य दिले. दंडे हनुमान हे एकमेव मंडळ त्यास अपवाद ठरले. डीजेद्वारे आवाजाच्या निकषांचे उल्लंघन केल्या प्रकरणी या मंडळाविरुद्ध सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गतवर्षी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील इतर भागांतही काही गणेश मंडळांनी डीजेचा वापर करीत नियम धाब्यावर बसविले. संबंधितांविरोधात पोलिसांनी कारवाई अस्त्र उगारले आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडक दरवाजा मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ, श्रीराम भवन मित्र मंडळ, जय माताजी मित्र मंडळ यांनी डीजेचा दणदणाट केला. या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सत्त्ताधाऱ्यांविरुद्ध मात्र गुन्हा नाही

डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा स्वीकारला असला तरी सत्ताधारी भाजपच्या विरोधात मात्र गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले गेले नाही. मुख्य मिरवणूक मार्गावर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून मंडळांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. महात्मा गांधी रस्त्यावर त्यात भाजप तसेच  स्थानिक वृत्त वाहिनीचे व्यासपीठ होते. आलेल्या मंडळांचे स्वागत करण्यासाठी दोन्ही व्यासपीठावरून डीजेचा दणदणाट करण्यात आला.   हा प्रकार लक्षात आल्यावर पोलीस अधिकारी भाजप व संबंधित वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावर गेले. कार्यकर्त्यांना समज देत सामग्री ताब्यात घेतली.  मात्र, गुन्हा दाखल करणे खुबीने टाळले गेल्याची भावना गणेश भक्तांमध्ये उमटली आहे.