News Flash

चार दिवस ध्वनिक्षेपकाचे!

गणेश मंडळांनी डिजेचा वापर टाळावा याकरिता पोलीस यंत्रणेने महिनाभरापासून प्रयत्न चालविले होते.

चार दिवस मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मध्यरात्रीपर्यंत परवानगी दिल्याने गणेश मंडळांना दिलासा

ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा अधिक खबरदारी घेत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांकडून नाराजी प्रगट होत असताना जिल्हा प्रशासनाने संबंधितांना काहीअंशी दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकली आहेत. त्या अंतर्गत गणेशोत्सवातील चार दिवस मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गणेश मंडळांनी डिजेचा वापर टाळावा याकरिता पोलीस यंत्रणेने महिनाभरापासून प्रयत्न चालविले होते. मिरवणुकीत डिजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. गणेश मंडपाच्या ठिकाणी गोंगाटाची पातळी मोजण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनी मापन यंत्रांची मुबलक उपलब्धता करण्यात आली. आवाजाच्या निकषांचे पालन न झाल्यास कारवाईचा इशाराही आधीच देण्यात आला. पोलिसांच्या खंबीर भूमिकेमुळे गणेशोत्सवात एरवी जसा सायंकाळनंतर गोंगाट होतो, तो बराचसा कमी झाल्याचे यावेळी जाणवले.

मंडपाच्या ठिकाणी डिजे वापर केला तरी ध्वनिची निश्चित मर्यादा ओलांडली जाणार नाही यावर यंत्रणेची करडी नजर ठेवून असल्यामुळे मंडळांचे पदाधिकारी नाराज आहे. यंत्रणांनी चालविलेल्या अटी व शर्तीच्या सक्तीविरोधात मध्यंतरी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. या घडामोडीत गणेशोत्सवास सुरूवात झाल्यानंतर प्रशासनाने गणेश मंडळ आणि देखावे पाहण्यास येणाऱ्या भक्तांचा विचार करत गणेशोत्सवातील काही दिवस ध्वनिक्षेपक वाजविण्याच्या निश्चित काळात वाढ केली आहे.

एरवी गणेश मंडळांना रात्री दहा वाजता मंडपात लावलेला ध्वनिक्षेपक बंद करावा लागतो. काही मंडळांचे चलतचित्र स्वरुपातील देखावे अथवा विद्युत रोषणाई ध्वनिक्षेपकावर अवलंबून आहे. रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक बंद करावी लागत असल्याने गणपती दर्शनाला आलेल्या भाविकांचा त्यामुळे हिरमोड होतो.

या पाश्र्वभूमीवर, जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी गणेशोत्सवातील चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास मान्यता दिली. शासकीय परिपत्रकानुसार बंद जागांखेरीज सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यच्या निकडीनुसार वर्षांत १५ दिवस निश्चित करून सकाळी सहा वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने १५ पैकी पाच दिवसांची सवलत राज्यभरात उपयोगात आणली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना आगामी उत्सव लक्षात घेऊन उर्वरित दहा दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापराबाबतच्या तारखा निश्चित करावयाच्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवातील चार दिवस, नवरात्रीमध्ये तीन दिवस, दिवाळीतील लक्ष्मी पूजन, नाताळ व नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ध्वनिक्षेपकाचे चार दिवस

ज्येष्ठ गौरी विसर्जनाचा दिवस म्हणजे ३१ ऑगस्ट, गणपती आरास पाहण्यासाठी ३ व ४ सप्टेंबर आणि गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ५ सप्टेंबर या दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत ध्वनिच्या विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 1:52 am

Web Title: ganeshotsav mandal permitted 4 days extra to use loudspeakers beyond 10 pm
Next Stories
1 ‘समृद्धी’च्या मार्गात इंधन वाहिनीचा प्रश्न
2 वंचितांचा आधारवड आधाराच्या प्रतीक्षेत!
3 सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची सेवा ठप्प; तिकिट खिडक्यांवरही शुकशुकाट
Just Now!
X