11 August 2020

News Flash

अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीस अटक

या प्रकरणी टोळीच्या मुख्य दलालासह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची परराज्यात तीन ते पाच लाख रुपयांना विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी टोळीच्या मुख्य दलालासह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. या पध्दतीने टोळीने १० ते १५ अल्पवयीन मुलींची वेगवेगळ्या भागात विक्री केल्याचा संशय आहे.

या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास सुरू असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.

पेठरोड येथे राजस्थान येथून काही मुलींची विक्री करण्यासाठी दलाल येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पेठ रस्त्यावर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून छगनलाल जोधराज जैन (५५, रा. पाली, राजस्थान), लुनकरण चोथामल परमार (५०, बाडनेर राजस्थान), कैलास भवरलाल सॅन (२१, पाली राजस्थान) यांना ताब्यात घेतले असता हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात छगनलाल जैन हा वेगवेगळ्या राज्यात अल्पवयीन मुलींची विक्री करतो.

नाशिक येथील दोन मुलींची त्याने चेन्नई व बंगलुरू येथे विक्री केली. याच प्रकरणात अटक केलेली अन्य संशयित सुनिता धरम गोराणे (नाशिक) हिने लग्नाच्या नावाखाली एकूण पाच अल्पवयीन मुलींची विक्री केल्याची माहिती दिली.

प्रत्येक मुलीची तीन ते पाच लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे टोळीने १० ते १५ अल्पवयीन मुलींची वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केल्याचा अंदाज आहे. त्यास पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी दुजोरा दिला.

ज्या ठिकाणची माहिती प्राप्त झाली आहे, तेथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यासाठी पोलीस पथके तातडीने रवाना करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 2:05 am

Web Title: gang arrested in girls trafficking
टॅग Nashik
Next Stories
1 कॉलेज रोडवरील अनधिकृत इमारतीवर पालिकेचा हातोडा
2 अमेरिकेत आंबा निर्यात विस्तारण्याची चिन्हे
3 शालेय पोषण आहार संघटनेचा मोर्चा
Just Now!
X