टोळ्यांमधील वादाचा सर्वसामान्यांना फटका

सामाजिक उपक्रमातून जनजागृती करण्यात मग्न असणाऱ्या शहर पोलिसांच्या दुसरीकडे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे मात्र, तीन तेरा वाजले आहेत. पंचवटीतील टोळ्यांमधील वादाचा सर्वसामान्यांना फटका बसत असून सोमवारी घडलेल्या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश कौउलकर, प्रेमचंद कौउलकर, रोहित कडाळे, हृषीकेश गरड, किरण, गोटू गोसावी व त्यांचे २५ ते ३० साथीदार (सर्व रा. वाघाडी) हाती कुऱ्हाडी, लाठय़ा-काठय़ा व तलवारी घेऊन सोमवारी रात्री गल्लीत शिवीगाळ व आरडाओरड करत शिरले. त्यातील काहींनी मारुती मंदिरासमोर वास्तव्यास असणारे द्वारकानाथ म्हस्के यांच्या हुंडाई मोटारीच्या काचा फोडल्या. नंतर या टोळक्याने झगडय़ा ऊर्फ विनायक लाटे याच्या घरात शिरत टीव्ही व इतर साहित्याची तोडफोड केली. टोळीतील काहींनी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या इतरांच्या दुचाकी, रिक्षा, मालवाहू गाडय़ांची तोडफोड केली. अकस्मात झालेल्या या घटनेमुळे नागरिकांची पळापळ झाली. जवळपास १० ते १२ गाडय़ांचे नुकसान झाले. काही दुचाकी टोळक्याने रस्त्यावर आडव्या फेकल्या. मंदिरासमोरील सार्वजनिक पाण्याची टाकी फोडली. जवळपास अर्धा तास गोंधळ घालून टोळके पसार झाले. दोन टोळ्यांमधील वादाची झळ नाहक सर्वसामान्यांना बसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला, लहान मुले व नागरिकांनी ठिय्या देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

महापालिका निवडणुकीनंतर गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी गुन्हेगार, टवाळखोरांविरुद्ध जी धडक कारवाई अव्याहतपणे केली जात असे, ती थंडावल्याचा हा परिपाक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चेन स्नॅचिंगच्या आजवर इतक्या घटना घडल्या की, त्यात कोटय़वधींचे सोने चोरटय़ांनी लंपास केले.

चोरटय़ांना पकडण्याऐवजी पोलीस चेन स्नॅचिंग व लुटमार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी, असा उलट सल्ला देतात, असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला. मागील दोन ते तीन महिन्यांत शहर पोलीस वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. असे उपक्रम राबविताना गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने कायदा व सुव्यवस्था ढासळू लागल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.

शांततेला पुन्हा गालबोट

काही वर्षांपूर्वी शहरात टोळक्यांचा धुडगूस, खून, हाणामारी, लुटमार, वाहनांची जाळपोळ व तोडफोड अशा घटनांनी नाशिकची तुलना नागरिकांनी थेट बिहारशी केली जात होती. तेव्हा गुन्हेगारांना राजाश्रय लाभल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करणेही पोलिसांना अवघड झाले होते. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे कुलवंतकुमार सरंगल यांनी स्वीकारल्यानंतर परिस्थितीत आमूलाग्र बदल झाले. सरंगल हे पोलीस फौजफाटा घेऊन फारसे बाहेर फिरत नसे. सार्वजनिक कार्यक्रमातही ते क्वचित दृष्टिपथास पडायचे; परंतु शहराच्या कानाकोपऱ्यात काय घडत आहे, त्यामागे कोण आहे याची खडान्खडा माहिती त्यांच्याजवळ असायची. गुन्हेगारी टोळक्यांवर कारवाईचे अस्त्र उपसताना राजकीय हस्तक्षेप त्यांनी धुडकावला. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांत दहशतीच्या गर्तेतून नाशिक बाहेर येण्यास सुरुवात झाली. झोपडपट्टी परिसरात गुन्हेगारांची शोध मोहीम, टवाळखोरांविरोधात कारवाई, गुन्हेगारी टोळक्यांच्या मुसक्या आवळणे ही अविरत मोहीम सुरू राहिल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली. सरंगल यांची कार्यपद्धती पुढील काळात पी. जगन्नाथन यांनी कायम ठेवल्याने काही काळ शहरवासीयांना अनुभवयास मिळालेल्या शांततेला सध्या गालबोट लागल्याचे चित्र आहे.

संशयितांची धरपकड सुरू

पंचवटीतील घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी रात्रीपासून वाघाडी परिसरात संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मंगळवारी दुपारी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाघाडी परिसर पिंजून काढला. उपरोक्त प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे.