News Flash

गंगापूर धरण निम्मे भरले

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात त्र्यंबकेश्वर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे गुरुवारी ५० टक्के जलसाठा झाला.

त्र्यंबकेश्वर परिसरातील मुसळधार पावसाने गंगापूरच्या जलसाठय़ात वाढ झाली आहे

जल संकटात दिलासा

नाशिक : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात त्र्यंबकेश्वर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे गुरुवारी ५० टक्के जलसाठा झाला. दीड महिना पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात शहरात पाणी कपात सुरू झाली आहे. गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला गेला. याच दिवशी गंगापूर निम्मे भरल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. एकाच दिवसात गंगापूरचा जलसाठा १३ टक्क्यांची उंचावला आहे.

शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी गंगापूर, दारणा (चेहडी बंधारा) आणि मुकणे धरण यातून पाणी घेतले जाते. मनपाच्या सात जलशुद्धीकरण केंद्रामार्फत दैनंदिन पिण्याचे पाणी पुरविले जाते. शहराची सर्वाधिक भिस्त गंगापूर धरणावर आहे. दीड महिना समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जलसाठा कमी होऊ लागला. उपलब्ध साठय़ाची बचत करण्यासाठी अलीकडेच पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्या अंतर्गत चालू आठवडय़ात गुरुवारी तर पुढील आठवडय़ापासून प्रत्येक बुधवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली. नेमक्या त्याच वेळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह दारणा आणि मुकणेच्या जलसाठय़ात वाढ होऊ लागली. यामुळे शहरासमोर दाटलेले टंचाईचे संकट दूर करण्यास हातभार लागणार आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरातील मुसळधार पावसाने गंगापूरच्या जलसाठय़ात वाढ झाली आहे. बुधवारी गंगापूरमध्ये २०९४ दशलक्ष घनफूट म्हणजे ३९.१९ टक्के जलसाठा होता. गुरुवारी त्यात ८०० दशलक्ष घनफूटहून अधिकने वाढ होऊन तो २८०० दशलक्ष घनफूटवर (५० टक्के) पोहोचला आहे. दारणातील जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला. मुकणे धरणात २४५२ (३४.५५ टक्के) जलसाठा झाला आहे. एरवी, जुलैच्या अखेपर्यंत या सर्व धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होतो. काही तुडुंब भरल्याने विसर्ग करावा लागतो. यंदा पावसाअभावी निर्माण झालेले सावट दोन दिवसांतील पावसाने बाजूला सारले गेले आहे.

गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात झालेली वाढ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 1:37 am

Web Title: gangapur dam is half full ssh 93
Next Stories
1 नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ‘ब्लॅक बीटर्न’ चे प्रथमच दर्शन
2 भातशेती पाण्याखाली
3 माल वाहतुकीत हमालीची जबाबदारी मालकावर
Just Now!
X