News Flash

गंगापूरमध्ये २४ तासांत एक टीएमसीहून अधिक पाणी

गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात सुमारे १.१ टीमसी अर्थात ११०० दशलक्ष घनफूटने वाढ झाली.

पावसाचा जोर ओसरला

नाशिक : सलग २४ तास जिल्ह्य़ातील काही भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी सकाळपासून काहिसा ओसरला. कुठे रिपरिप, तर कुठे त्याने उघडीप घेतली. चोवीस तासात जिल्ह्य़ात ७२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच दिवसात २०० मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात सुमारे १.१ टीमसी अर्थात ११०० दशलक्ष घनफूटने वाढ झाली. अशा प्रकारे अल्पावधीत इतका जलसाठा होण्याची ही काही वर्षांतील पहिलीच घटना आहे. इतरही काही धरणांमध्ये असाच जलसाठा वाढला. शहरातील पाणी कपात मागे घ्यायची की नाही, याबद्दल सत्ताधाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

महिनाभरापासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नाशिकमध्ये शनिवारी रात्रीपासून खऱ्या अर्थाने पावसाने आपले अस्तित्व दाखवले. रविवारी रात्रीपर्यंत काही भागात मुसळधार पाऊस झाला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासात जिल्ह्य़ात ७२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक २०० मिलीमीटर पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये पडला. नाशिक १०२, इगतपुरी ६३, दिंडोरी ४२, पेठ ११६, सुरगाणा ५६ आणि सिन्नरमध्ये ७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक शहरातील सखल भागात पाणी शिरले. जलमय झालेल्या परिसरातील पाणी पावसाचा जोर कमी झाल्यावर ओसरले. अनेक भागात रिपरिप सुरू होती. गोदावरी नदीची उंचावलेली पातळी बरीच कमी झाली. होळकर पुलाखालून ३०० क्युसेस पाणी वाहत आहे. नांदूरमध्यमेश्वरमधील २२ हजार क्युसेसचा विसर्ग सोमवारी ५११ क्युसेसवर आला. सात तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यांत एकतर पाऊसच नाही किंवा त्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. निम्म्या भागात मुसळधार सुरू असताना नांदगावमध्ये पाऊसच नव्हता. मालेगावमध्ये एक मिलीमीटर, बागलाण चार, देवळा एक, येवला १५, कळवण सहा, चांदवड ११ मिलीमीटर अशी नोंद आहे. गतवर्षी पावसाने काही मर्यादित भागात हजेरी लावली होती. उर्वरित भागाला बराच काळ तिष्ठत रहावे लागले. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली. दरम्यान, गंगापूरमध्ये समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे पाणी कपात मागे घ्यावी की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे महापौर रंजना भानसी यांनी म्हटले आहे.

गंगापूर धरणात सात टक्क्य़ांनी वाढ

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघ्या एकाच दिवसातील पावसाने जलसाठा जवळपास ११०० दशलक्ष घनफूट म्हणजे १.१ टीएमसी उंचावला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील संततधारेमुळे या भागातील धरणांची पाणी पातळी उंचावली. रविवारी जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये केवळ पाच हजार ३९४ अर्थात आठ टक्के जलसाठा होता. एकाच दिवसात त्यात सुमारे चार हजार दशलक्ष घनफूट अर्थात चार टीएमसीने वाढ होऊन तो नऊ हजार २४९ म्हणजे १४ टक्क्य़ांवर पोहचला. अर्थात त्यात गंगापूर वरच्या क्रमांकावर आहे. गंगापूर धरणात रविवारी सकाळी ८५७ दशलक्ष घनफूट (१५ टक्के) जलसाठा होता. सोमवारी तो सुमारे दोन हजार दशलक्ष घनफुटवर (३५) पोहचला. काश्यपीमध्ये ४५३ (२४), गौतमी गोदावरी ३९८ (२१), आळंदी १३४ (१४), दारणा २७४६ (३८), भावली ५६१ (३९), मुकणे ८६८ (१२), नांदूरमध्यमेश्वर १४० (५४) असा जलसाठा झाला आहे.

सात धरणे कोरडीच

ज्या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प आहे, तेथील धरणांची अवस्था मात्र बिकट आहे. आजही सात धरणे कोरडी असून अनेक धरणांमध्ये जेमतेम पाणी आहे. पुणेगाव, तिसगाव, चणकापूर, केळझर, नागासाक्या, माणिकपूज, भोजापूर या धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. पालखेड १२० (१८), करंजवण ११७ (दोन), वाघाड १४६ (सहा), ओझरखेड ५३ (दोन), कडवा १३३ (आठ), हरणबारी ३० (तीन), गिरणा १३७४ (सात), पुनद ३६ (तीन) असा जलसाठा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2019 7:27 am

Web Title: gangapur dam water level increase by more than one tmc zws 70
Next Stories
1 पंचवटीत जुन्या इमारतीचा भाग कोसळला
2 धरणांतील निम्मी उपकरणे बंद
3 विविध स्तरांतून अर्थसंकल्पाचे संमिश्र स्वागत
Just Now!
X