नॅबकडून महापालिकेला प्रस्ताव

पाण्याचा रंगीत कारंजा.. आकर्षक वृक्ष व हिरवळ.. लहान मुलांसाठीची विविध खेळणी.. एरवी कोणत्याही उद्यानांमध्ये दिसणारे चित्र. मात्र दृष्टिबाधित तसेच अपंग प्रवर्गातील विविध घटकांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे याचा आनंद घेता येत नाही. यासाठी शहरात ‘संवेदना उद्यान’ उभारण्याची गरज नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंडने मांडली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने हा प्रकल्प राबवून आपले वेगळेपण सिध्द करावे, अशी अपेक्षा नॅबचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

बाल गोपाळांना खेळण्याचे हक्काचे ठिकाण देण्याकरिता शहरात विविध भागात अनेक उद्याने उपलब्ध आहेत. मात्र विशेष गरजा असणाऱ्या  अपंग व दृष्टिबाधितांना मात्र या आनंदापासून वंचित रहावे लागते. विशेष बालक व त्यांच्या पालकांच्या गरजा लक्षात घेता अशा घटकासाठी महापालिकेने शहर परिसरात ‘संवेदना उद्यान’ तयार करावे असा प्रस्ताव नॅबने महापालिकेला दिला आहे.

दृष्टिबाधित व अपंगांचे शारीरिक व्यंग लक्षात घेत बगीच्यात जमिनीचे चढ-उतार ठरविले जातात. उद्यानात तशी भूपृष्ठाची रचना करावी लागेल. चौकोनी, त्रिकोणी, गोल असे वेगवेगळ्या प्रकारचे आकार स्पर्शज्ञानाने समजावे यासाठी तसे रेलिंग्ज उभारणे, स्पर्शाद्वारे टेक्सचर समजावे यासाठी रेती, वाळू, खडी, विविध आकार व प्रकारचे गोटे प्लॅस्टर करत त्यांचे आकृतीबंध तयार करावे लागतील. गंध ज्ञान व्हावे यासाठी प्रस्तावित उद्यानात सुवासिक फुलांसह औषधी वनस्पती व झाडे लागवड करावी लागतील. आकार ज्ञान व्हावे यासाठी वेगवेगळ्या आकार व धातूच्या कुंडय़ा तयार करून चालतांना त्याचा अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आकाराची पोकळी समजावी या करीता विविध आकाराच्या पाईपच्या आधारे अंध-अपंगाना जाण्या-येण्यासाठी बोगदा करता येईल.

सी-सॉ, घसरगुंडी, झोके आदी खेळांचे साहित्य उद्यानात उभारताना दुखापत होणार नाही याची व्यवस्था करणे अभिप्रेत आहे. या उद्यानाचा सर्वसामान्यही वापर करू शकतील अशी व्यवस्था यामध्ये करण्याकडे नॅबने लक्ष वेधले आहे.

यासाठी नॅब संकुलात निर्मिलेल्या छोटेखानी बगीच्याचा अभ्यास करण्यास सुचविण्यात आले आहे. प्रस्तावासोबत त्याचा नकाशा, लागणारे साहित्य, रचना यासंबंधीचा तपशील सादर करण्यात आला आहे. महापालिका अपंगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के निधीची रक्कम उद्यान उभारणीकरीता वापरू शकते, याकडे नॅबने लक्ष वेधले आहे. या उद्यानामुळे संबंधितांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी व्यक्त केला.

अपंगासाठीचा राखीव निधी वापरावा

अपंगांच्या प्रश्नावर काम करताना त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार होणे महत्वाचे आहे. अपंगांसाठी राखीव असलेल्या निधीतून संवेदना उद्यानाची निर्मिती करता येईल. महापालिका सध्या स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र अपंगांसाठी संवेदना उद्यान तयार करत ती खऱ्या अर्थाने ‘स्मार्टनेस’कडे वळू शकते. महापालिकेने अशा अनोख्या उद्यानाची निर्मिती करत दृष्टिबाधितांसाठी स्पर्शज्ञान व दिव्यांगामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

– मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड)