घरोघरी सिलिंडर पोहोचविणाऱ्या टेम्पो चालकाकडून सिलिंडरमधून गॅसची चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. त्यातीलच एक धक्कादायक प्रकार शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि आडगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून उघडकीस आला आहे.

घरोघरी गॅस सिलिंडर पोहोच करणारे टेम्पो चालक, कामगार सिलिंडरमधील गॅस चोरून ग्राहकांना कमी वजनाच्या सिलिंडरचा पुरवठा करतात, असा संशय आणि तशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्याची दखल घेऊन संबंधितांवर पाळत ठेवून कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सिलिंडरच्या वितरण व्यवस्थेवर नजर ठेवली. याच दरम्यान मखमलाबाद येथील भारत गॅसच्या गोदामातून घरोघरी सिलिंडर पोहचविणारा वितरकाचा टेम्पो चालक गॅस चोरी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांना मिळाली. या आधारे गिरमे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार अनिल दिघोळे, विशाल काठे यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकत संशयित टेम्पो चालक संजय चव्हाण (४२, गंगोत्री विहार कॉलनी, अमृतधामजवळ, पंचवटी) याला रंगेहात पकडले.

संशयित चालक गोदामातून भरलेले सिलिंडर टेम्पामधून घेऊन गंगोत्री विहार येथील बंगल्याच्या मोकळ्या जागेत येत असे. या ठिकाणी भरलेल्या सिलिंडरचे वेष्टन तोडून विशिष्ट उपकरणाद्वारे गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत असे. संशयिताकडून १३ गॅस सिलिंडर, ताण काटा, गॅस अन्य सिलिंडरमध्ये भरावयाचे उपकरण, असे सुमारे अडीच लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक ए. एम. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, नागेश मोहिते, दीपक गिरमे, उपनिरीक्षक चंदकांत पळशीकर, जाकीर शेख, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द अत्यावश्यक वस्तू कायदा आणि ज्वलनशील पदार्थाची धोकादायकपणे हाताळणी या कलमांन्वये कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

तीन ते चार महिन्यांपूर्वी याच प्रकारची कारवाई गुन्हे शाखा युनिट एकने पंचवटी भागात केली होती. तेव्हाही सिलिंडरमधून गॅसची चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले होते.   उपरोक्त घटनेत सुमारे दीड ते दोन महिन्यांपासून सिलिंडरमधून गॅस चोरीचा प्रकार सुरू होता. याबाबत स्थानिकांनी माहिती दिली नसल्याबद्दल पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले. असे प्रकार कुठे सुरू असल्याचे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षता घ्या

एका सिलिंडरमध्ये साधारणपणे १४.०२ किलो गॅस असतो. रिकाम्या सिलिंडरचे वजन १५.०८ किलो असते. ज्यावेळी सिलिंडर घरी येते, तेव्हा प्रामुख्याने महिला घरी असतात. त्यांच्याकडून सिलिंडरचे वजन करून घेण्याची फारशी शक्यता नसते. उपरोक्त संशयित टेम्पो चालक प्रत्येक सिलिंडरमधून दोन ते अडीच किलो गॅस चोरी करत होता. हे सिलिंडर पुढे ग्राहकांना पुरविले जायचे. म्हणजे ग्राहकाला केवळ ७५ ते ८० टक्के गॅस मिळत होता. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचा मुद्दा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे यांनी मांडला. सिलिंडरवर गॅसचे आणि रिकाम्या सिलिंडरचे वजन स्वतंत्रपणे लिहिलेले असते. सिलिंडरचे वेष्टन बंदीस्त स्वरुपात नसल्यास ग्राहक तक्रार करून ते सिलिंडर नाकारू शकतो. तसेच घरातच वजन केल्यास सिलिंडरमध्ये खरोखर नमूद केलेला गॅस आहे की नाही याची खातरजमा करता येईल.