आरोग्य विद्यापीठ दीक्षान्त सोहळ्यात गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

वैद्यकीय क्षेत्राला ‘कट प्रॅक्टीस’चा मोठा रोग जडला असून त्यात गोरगरीब जनता भरडली जात आहे. ग्रामीण भागातून रुग्ण शहरातील रुग्णालयात पाठवताना २५ ते ५० पर्यंत टक्केवारी दिली जाते.  याला घरात खायला नाही, असा रुग्ण अन् त्याच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारांचा अवाढव्य खर्च कसा पेलवणार, असा प्रश्न करत वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टीस’ विरोधात कायदा करावा लागणे हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १७ वा दीक्षान्त सोहळा बुधवारी विद्यापीठाच्या सभागृहात महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक प्रा. डॉ. रंदीप गुलेरिया आणि टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महाजन यांनी डॉक्टरांच्या नवीन पिढीला कट प्रॅक्टीसपासून दूर राहण्याचे आवाहन केले. एरवी विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात प्र कुलपतींचे भाषण छापील असते. तसे भाषणही महाजन यांच्यासाठी तयार झाले होते. परंतु, त्याचे वाचन करताना महाजन यांनी वैद्यकीय क्षेत्रातील ज्या गोष्टी खटकतात, त्यावर थेट भाष्य करताना आरोग्य विद्यापीठाचे कान टोचले. राज्यातील शासकीय महाविद्यालयांमार्फत वेगवेगळ्या आजारांवर संशोधन होणे आवश्यक होते. परंतु, ही महाविद्यालये आणि त्यांची रुग्णालये आज निव्वळ रुग्ण तपासणी-उपचाराची केंद्र झाली आहेत.  रुग्णांचा कमालीचा ताण असल्याने संशोधनाकडे दुर्लक्ष झाले. या रुग्णालयांमध्ये अपेक्षित संशोधन होत नाही. उपरोक्त ठिकाणी ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टर , रुग्ण्,  नातेवाईकांमध्ये संवाद होत नसल्याने अनेकदा बिकट स्थिती निर्माण होते. असे प्रसंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद राखणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये शस्त्रधारी सुरक्षा व्यवस्थेत रुग्णांवर उपचार करणे योग्य ठरणारे नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. बडवे यांनी शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे नमूद केले. नवोदित डॉक्टरांनी यानिमित्ताने एक टप्पा गाठला. मात्र, त्याचवेळी पुढील आयुष्यात मोठय़ा प्रवासाला सुरूवात झाली आहे. वैद्यकीय उपचार, तंत्रज्ञानातील बदल, आधुनिक तंत्रज्ञान कायमस्वरुपी आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक प्रा. डॉ. गुलेरिया यांनी सर्व डॉक्टरांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी एकत्रित काम करून दुर्गम भागात सेवा देण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. आज एखाद्या देशात आलेला नवीन आजार दुसऱ्या देशात पोहोचण्यास वेळ लागत नाही. त्यादृष्टीकोनातून काम करण्यास सजग राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला.

गरीब रुग्णांकडे मानवतेने पाहण्याची गरज

राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. कर्जबाजारीपणामुळे या आत्महत्या होत असून त्यामागे आजारपणावरील प्रचंड खर्च हे देखील एक कारण आहे. एखादे हाड तुटल्यावर उपचार घेण्यासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च लागतो. ग्रामीण भागात शेतात मोल मजुरी करणारा रुग्ण ही रक्कम कशी भरणार ? संबंधितांना शासनाच्या योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीची कल्पना नसते. नवोदीत डॉक्टरांनी ग्रामीण भागातील उपेक्षित रुग्णांकडे प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात ठिकठिकाणी आपण आरोग्य शिबिरे आयोजित करतो. मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांना रुग्ण तपासणीसाठी नेले जाते. ग्रामीण व दुर्गम भागातील विदारक स्थिती शिबिरांमधून समोर येते. अनेकांकडे उपचारासाठी पैसे नसतात. योजनांची माहिती नसते. अशा रुग्णांसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सुवर्ण पदकांवर नाशिकचे वर्चस्व

सोहळ्यात विविध आरोग्य विद्याशाखांतील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रथम आणि विविध विषयांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या ७४ जणांना सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संशोधन पूर्ण करणाऱ्या २२ विद्यार्थ्यांना पीएचडी देण्यात येईल. २०१६-१७ या वर्षांत पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणि आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ८८८३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.   नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील सुलतान मोईऊद्दीन शौकतअलीने नऊ तर याच महाविद्यालयाच्या मानसी गुजराथी यांनी सात सुवर्णपदके पटकावत नवीन विक्रम रचला. मूळ ठाण्यातील सुलतानने कुटुंबियांनी दिलेले प्रोत्साहन आणि अभ्यासात झोकून दिल्यामुळे हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची त्याची मनिषा आहे. नाशिकच्या मानसी गुजराथी यांची कथा वेगळी. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी हे यश मिळवले. लग्नाआधी त्यांनी वैद्यकीय शाखेची पदविका मिळवली होती. लग्नानंतर मुले व कुटुंबियांची जबाबदारी सांभाळत त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. ‘इंटर्नल मेडिसिन’ विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा आहे.  वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टीस’ विरोधात त्यांनी मतप्रदर्शन केले. अशा प्रकाराने वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांची प्रतिमा मलीन होते. आपण अशा गोष्टींना कधीही थारा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.