शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली असून पुढील पंधरा दिवसांत बदल पाहावयास मिळतील, असे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाहनांची जाळपोळ, खून, टोळीयुद्ध, महिलांचे दागिने खेचून नेणे, टवाळखोरांचा धुडगूस या घटनांची अव्याहतपणे मालिका सुरू आहे. या संदर्भात शनिवारी पालकमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतला. याआधी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. परंतु, शहरातील स्थितीत अपेक्षित बदल झाला नसल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. यामुळे पुढील पंधरा दिवसांत नेमके काय बदल होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे.
सिंहस्थाच्या काही दिवस आधी कुलवंतकुमार सरंगल यांची उचलबांगडी करत शासनाने नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा एस. जगन्नाथन यांच्याकडे सोपविली. तेव्हापासून शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करण्याची मागणी आधीच केली आहे. गेल्या पाच महिन्यांत शहरात २४ खून झाले. वाहनांची जाळपोळ व टवाळखोरांचा धुडगूस सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर, पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महाजन यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. गुन्हेगारी नियंत्रणासाठी तडिपारी, मोक्का, एमपीडीएसारख्या कायद्यान्वये कारवाई करावी, असे सूचित करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु, परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. यामुळे पुढील पंधरा दिवसांत शहरवासीयांना बदल पाहावयास मिळतील, असे त्यांनी सूचित केले.