गिरीश महाजन यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. त्या ठिकाणी  जोरदार टक्कर होत असताना सेनेला उमेदवार उभे करून अपशकून करायचा नव्हता, असे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सांगितले. भाजप हा सेनेचा मुख्य शत्रू असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राऊत यांच्या विधानांचा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी समाचार घेतला. सततच्या अपयशाने सेना खचली आहे. त्यामुळे नैराश्यातून सेनेकडून भाजपवर आरोप होत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त नाशिक येथे आलेल्या खा. राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पुन्हा भाजपवर टिकास्त्र सोडले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. भाजपशी युती होवो किंवा न होवो, आम्ही निवडणुकीच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदल्या दिवशी मेळाव्यात राऊत यांनी भाजपवर शरसंधान साधले होते. भाजप हा कपटी शत्रू असून त्यांना आडवे करा असे विधान केले होते.

जनता दरबार निमित्त नाशिक येथे आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राऊत यांच्या विधानांवर प्रत्युत्तर दिले. सेनेची राज्यात काय स्थिती आहे हे सर्वाना ज्ञात आहे. वारंवार प्रयत्न करूनही महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना अपयशी ठरली. त्यामुळे शिवसेना खचली आहे. अपयश झाकण्यासाठी त्यांना कारणे शोधावी लागतात, असा टोला महाजन यांनी या वेळी लगावला.