गिरीश महाजन यांची टीका

नाशिक : राज्य सरकारने बुधवारी मंदिरे बंद ठेवून आडमुठेपणा केला आहे. मुख्यमंत्र्यांना अयोध्येत भूमिपूजनासाठी निमंत्रण आले नसल्याचे त्यांच्या पथ्यावर पडल्याचा टोला माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी हाणला आहे.

अयोध्येतील मंदिर भूमिपूजनानिमित्त येथे श्रीकाळाराम मंदिराच्या पूर्व महाद्वाराबाहेर भाजपच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेस महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे या आमदारांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाजन यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. करोना विषाणूचा धोका दाखवत आजच्या दिवशी मंदिरे बंद ठेवून आडमुठेपणा केला आहे. मंदिरे खुली असती तर मंदिरातील पुजारी आणि भाविकांनी सामाजिक अंतर पथ्याचे पालन करत हा दिवस उत्साहात साजरा केला असता. प्रशासनाने नागरिकांची अडवणूक केली आहे.  तीन पक्षांच्या सरकारचा भूमिपूजनालाच विरोध होता. त्यांना ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन हवे होते. त्यामुळेच राज्यातील मंदिरे आज बंद असल्याचा आरोप महाजन यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना भूमिपूजनाचे निमंत्रण न येणे हे त्यांच्या पथ्यावर पडले. सहकारी पक्षांनी भूमिपूजन सोहळ्याला जाऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यामुळे ते कार्यक्रमाला जातील की नाही याविषयी साशंकता असल्याने मुख्यमंत्र्यांची फजिती झाली होती. परंतु मुख्यमंत्र्यांना भूमिपूजनासाठी निमंत्रण न आल्याने त्यांच्या पथ्यावर पडल्याचे महाजन यांनी सागितले.