शालेय विद्यार्थ्यांंची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकाने पाच वर्षीय बालिकेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळा सुटल्यानंतर चालकाने या बालिकेला उद्यानात नेऊन चॉकलेट खायला देत हे कृत्य केल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयिताला अटक केली.
खासगी वाहनाने शाळेत ये-जा करणे कधी कधी कसे धोकादायक ठरू शकते, हे उपरोक्त घटनेने दाखवून दिले आहे. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणारी पाच वर्षांची मुलगी सोमवारी अशाच खासगी वाहनाने घरी परतत होती. वाहन चालक स्वप्नील किशोर जुन्नरे (३०) याने तिला घरी न नेता तिच्यासह अन्य एका विद्यार्थिनीला कृषी नगरच्या जॉगिंग ट्रॅक उद्यानात नेले.
या ठिकाणी त्याने मुलीला चॉकलेट खाण्यास दिले आणि अश्लील चाळे केले. ही गोष्ट घरी सांगितल्यास उद्या वाहनात बसल्यावर मारू, अशी धमकी दिल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी स्वप्नील जुन्नरे विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बालकांचे लैिगक शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलीस नाईकाकडून विनयभंग
जिल्हा न्यायालय आवारात नांदूर शिंगोटे येथील पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.
काही कामानिमित्त अल्पवयीन मुलगी न्यायालयात आली होती. त्यावेळी पोलीस नाईक विजय लोखंडेने बोलण्याच्या बहाण्याने तिला वाहनाच्या मागील बाजूस बोलावले. तिचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.