नाशिक : एकतर्फी प्रेमातून संशयिताने तरुणीवर शस्त्राचे वार करून जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी निफाड तालुक्यातील कसबेसुकेणे येथे घडली. यावेळी मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करणारे वडीलही हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर संशयित स्वतहून ओझर पोलिसांसमोर हजर झाला असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत डेंगळे हे कुटुंबीयांसह कसबे सुकेणे गावात राहतात. संशयित सूरज चव्हाण (२८) हा शेजारील मौजे सुकेणे गावातील रहिवासी आहे. सूरज आणि  डेंगळे यांची मुलगी विद्या (२१) हे दोघेही नाशिकच्या महिंद्रा कंपनीत कामाला होते. सोबत काम करत असतांना सूरजला विद्याबद्दल जवळीक वाटू लागली. विद्याकडे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न सूरजने केल्यावर तिने त्यास अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. मंगळवारी सकाळी विद्या वडिलांसह घराच्या पडवीत बसली असताना त्या ठिकाणी सूरज आला. सूरजने विद्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आत सूरजने विद्यावर चाकूने सपासप वार केले.

सूरजच्या तावडीतून विद्याला सोडविण्यासाठी वडील चंद्रकांत डेंगळे हे धावले. सूरजने त्यांच्यावरही चाकूचे वार केले. या प्रकारात ते गंभीर जखमी झाले. चाकूच्या वारामुळे विद्याचा मृत्यू झाला. यानंतर सूरज थेट ओझर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बंदोबस्त तैनात केला. चंद्रकांत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.