मुलींचे प्रमाण अधिक असणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्याची योजना

विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे प्रयत्न सामूहिक स्तरावर होण्यासाठी गावपातळीवर मुलींचे दर हजारी प्रमाण मुलांपेक्षा जास्त असणाऱ्या ग्रामपंचायतीस विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सरकारच्या या योजनेविषयी महिला बालकल्याण विभागच अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या वतीने लोककलेच्या माध्यमातून या विषयाकडे लक्ष वेधण्यास सुरुवात झाली आहे.

बीडसह राज्यात स्त्रीभ्रूण हत्येची विविध प्रकरणे समोर येत असताना महिला आणि बालविकास विभाग मुलींचा जन्माचा दर वाढावा या दृष्टीने विविध योजना अमलात आणत आहे. यामध्ये गर्भलिंग निदान कायद्याची कठोर अंमलबजावणी.. करू या स्त्री जन्माचे स्वागत.. माझी कन्या भाग्यश्री अशा योजनांसह मुलीच्या संगोपनासह शिक्षणाकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत आणि संगोपनअंतर्गत एकुलती एक मुलगी असल्यास मुलीच्या पालकांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होतील, तर तिच्या आजी-आजोबांना प्रोत्साहनात्मक कमाल पाच हजार रुपयांपर्यंत सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे. यासह विविध योजना समोर येत असतांना याविषयी सामूहिकरीत्या प्रबोधन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्य़ात या योजनांना अल्प प्रतिसाद आहे. ग्रामीण भागात आजही मुलगा हवा हा अट्टाहास असल्याने योजनांचे लाभार्थी कमी आहेत. देवळा, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातही मुलींचे प्रमाण कमी आहे. यामुळे गावपातळीवर आजही वंशाच्या दिव्यासाठी असणारा अट्टहास पाहता महिला बाल कल्याण विभागाने ज्या गावात मुलींचे दर हजारी प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतीस पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी महिला बालविकास सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राज्यस्तरावरून नमूद करण्यात आले आहे. अनभिज्ञ असल्याचे कारण देताना महिला बालकल्याण तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्यापर्यंत या योजनेची माहिती पोहचली नसल्याने  संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

जन्मदर वाढविण्यासाठी लोककलेचा आधार

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपलब्ध आकडेवारीचा आधार घेत जिल्ह्य़ात मुलींच्या जन्माचा दर वाढण्यासाठी लोककलेचा आधार घेत पथनाटय़, नाटक, पोवाडा, भारूड, वासुदेवाची गाणी अशा विविध माध्यमातून कार्यक्रम आयोजित करत प्रबोधनावर भर देण्यास सुरुवात केली आहे. असे जिल्ह्य़ात २५ कार्यक्रम होणार असून त्याव्दारे मुलगी वाचवा, कुटुंब कल्याण, स्वाईन फ्लू, नियमीत लसीकरण याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय नवजात मुलींचे प्रमाण

पेठ (११४३), देवळा (११९२), त्र्यंबक (१४४६),नाशिक (१५६२), नांदगाव (१५९४), कळवण (१६०५), येवला (१७३८), सुरगाणा (१७५५), चांदवड (१८३०), बागलाण (२३९६), दिंडोरी (२६६५), इगतपुरी (२०६७), मालेगाव (३०८७), निफाड (३३३१), सिन्नर (२१७३)