शिक्षणाच्या अर्थाजनासाठी आदिवासी भागातील मुलींची धडपड

रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठ सजली असून वेगवेगळ्या रंगातील आणि आकारातील राख्यांसह भेटवस्तूंचे विविध पर्याय बहीण-भावांना खुणावत आहेत. शिक्षणासाठी अर्थाजन करण्यासाठी ग्रामीण आदिवासी भागातील काही मुली अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटच्या ‘शोधिनी’ प्रकल्पाच्या माध्यमातून एकत्र आल्या. त्यांनी खाऊच्या पैशातून राख्या तयार केल्या असून त्याची विक्री ते थेट ग्राहकांना करत आहेत.

संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींचे शिक्षण, आरोग्य, अधिकारी, सक्षमीकरण या विषयांवर दोन वर्षांपासून कृती संशोधन सुरू आहे.

जिल्हा परिसरात आदिवासीबहुल दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी शाळेत जाणाऱ्या शंभर किशोरवयीन मुलींची निवड संशोधनासाठी करण्यात आली. या मुलींना आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी शिक्षण थांबवून मजुरी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले. यातील २५ मुलींनी लहान-मोठे उद्योग करण्याची तयारी दर्शविली, परंतु त्यासाठी भांडवल कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण झाला. कमी खर्चात काही उद्योग करता येईल का, याविषयी विचार सुरू असताना मुलींनीच रक्षाबंधन डोळ्यासमोर ठेवत राख्या तयार करण्याचे ठरविले. या राखीला ‘शोधिनी’ नाव देण्यात आले.

त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेशगाव, वेळुंजे, ब्राह्मणवाडे, हिरडी आणि रोहिले या पाच गावांतील १५ ते २० वयोगटातील २५ मुली एकत्र आल्या. यातील बहुतांश मुली १० वीत शिकत असून काही ११ वी, १२ वीत आहेत. दोन जणींची शाळा सुटली आहे. पुढील शिक्षणाकरिता पैसे जमविण्यासाठी या मुलींनी स्वत: राखी तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी अभिव्यक्तीच्या वतीने त्यांना राखी बनविण्यासाठी मॅक्रामचे धागे, मणी, रंगीत धागा आदी साहित्य पुरविले जात आहे. वेगवेगळ्या गाठी आणि मण्यांच्या मदतीने मुली राख्या तयार करत आहेत.

प्रारंभी मुलींनी खाऊचे पैसे, रक्षाबंधन-भाऊबीज, वाढदिवसाची ओवाळणी म्हणून आलेले पैसे एकत्र केले. संस्थेच्या वतीनेही काही आर्थिक मदत करण्यात आली. मुलींनी शाळा, अभ्यास, घरातील कामे सांभाळून ७० राख्या तयार केल्या. अभिव्यक्तीच्या वतीने आपल्या मित्रपरिवारात, ओळखीच्या लोकांमध्ये त्या वितरणास सुरुवात केली.

या राख्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून मुलींनी सध्या २५० राख्या तयार केल्या आहेत. रक्षाबंधनाचा उत्सव केवळ बहीण-भावाच्या नात्यापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागाशी तुटत जाणारे आपले बंध अधिक घट्ट करण्यासाठी शहर परिसरातूनही राख्या खरेदी करण्याचे आवाहन अभिव्यक्ती आणि शोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

उपक्रमास प्रतिसाद

राख्या बनविल्या तर आपणास पैसे मिळू शकतील. मिळणाऱ्या पैशातून वह्य़ा, पुस्तके बस प्रवासाचे भाडे असा खर्च निघू शकतो. रोजगारासाठी मजुरीशिवाय पर्याय नाही. शाळा किंवा महाविद्यालयाला दांडी मारली तरी मजुरीचे काम मिळेल याची शाश्वती नाही. त्यातही ऋतुमानाप्रमाणे काम पाहून १०० रुपयांपासून पुढे मजुरी मिळते. यामुळे कमी वेळात आम्ही हा उद्योग सुरू केला असून यास प्रतिसादही लाभत आहे.

-संगीता मोंढे, शोधिनी, त्र्यंबक