05 August 2020

News Flash

पैसे परत द्या किंवाअवयवांचा लिलाव करा..!

‘बँक मित्र’कडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचा टाहो

‘बँक मित्र’कडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांचा टाहो

नाशिक : कोणाचे ठरलेले लग्न मोडण्याच्या बेतात.. दुर्धर आजारावर उपचार बाकी.. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविताना घरातला दैनंदिन खर्च भागवायचा कसा अशा दृष्टचक्रात दाभाडी परिसरातील शेतकरी अडकले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राच्या ‘बँक मित्रां’कडून गंडवल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी इदगाह मैदानावर बिऱ्हाड मोर्चा मांडला. आमचे पैसे परत द्या अन्यथा आमच्या शरीरातील अवयवांचा लिलाव करा, अशी मागणी हतबल शेतकऱ्यांनी केली आहे.

मालेगाव येथील दाभाडी परिसरातील १०० हून अधिक शेतकरी दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत ग्राहक आहेत. त्यांनी आपली स्व-कमाई किंवा अन्य बचतीचे पैसे हे बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये गुंतविले. मात्र सात ते आठ महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या वेळी गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता खात्यावर पैसे नसल्याचे लक्षात आले. यामध्ये १९७ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

याविषयी बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी अपहारबाधित कृती समितीचे शेखर पवार यांनी माहिती दिली. दाभाडी शाखेत गावातील शेतकरी आणि शेतमजुरांनी ‘बँक मित्र’च्या मदतीने एक कोटी ५२ लाख रुपयांची रक्कम गुंतविली. मात्र त्यातील केवळ ८५ हजार आणि ४० हजार रुपये दोन टप्प्यात भरले गेले. उरलेल्या पैशांचा अपहार झाला. फसव्या व्यवहाराचे आमच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत. त्यामुळे अंशत: काही रक्कम तक्रारदार शेतकऱ्यांना मिळाली असली तरी अद्याप एक कोटी रक्कम प्रलंबित आहे. पैसे नसल्याने वेगवेगळ्या अडचणींना शेतकरी तोंड देत आहेत. गावातील शेती आणि शेतीविषयक कामे करण्यासाठी सावकाराकडून कर्जाने पैसे घेतले आहेत. गावात तक्रारदारांपैकी कोणाला हृदयाशी संबंधित काही शस्त्रक्रिया करायच्या आहेत. कोणाला शिक्षणासाठी मुलांकडे पैसे पोहचवायचे आहेत. हे सर्व बेत आता रहित झाल्याचे पवार म्हणाले.

भिला पवार यांनी बँक खात्यावरील पैसे अपहारित झाले असून बँक प्रशासनाने चर्चेत आमचे पैसे परत देण्याचे कबूल केले, काही अंशी पैसे दिले. पण आता उर्वरित पैसे देण्यास नकार दिला आहे. बँक प्रशासनाच्या वर्तनाचा आम्हाला संशय येत असून आम्ही आत्मक्लेश म्हणून मूत्रपिंड, डोळे, यकृत विक्रीस काढले असल्याची हतबलता व्यक्त केली.

सुनीता पवार यांनी आमची शेती नसली तरी शेतमजुरी किंवा अन्य ठिकाणी कमावून मुलांनी दिलेले पैसे आम्ही अडीअडचणीला कामास पडतील म्हणून बँकेत ठेवले. आता खात्यावर पैसेच नसल्याने भीक मागण्याची वेळ आल्याचे सांगितले.

‘बँक मित्र’ने गंडवले

ज्या शेतकऱ्यांना वेळच्या वेळी बँकेत येऊन पैसे जमा करणे किंवा अन्य कामे करता येत नाही. त्यांच्यासाठी ‘बँक मित्र’ काम करतात. अशाच काही बँक मित्रांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दाभाडीमधून १९७ शेतकऱ्यांची फसवणूक झाली. त्यातील ९८ दाव्यांमध्ये पैसे दिले गेले आहेत. मात्र उर्वरित तक्रारदारांकडे कुठलाच लेखी पुरावा नाही. हवाई व्यवहारावर फसवणूक झाली कसे म्हणायचे? शेतकऱ्यांनी या संदर्भात पावत्या जमा करणे, नोंद घेणे गरजेचे होते. यामुळे सेटलमेंट करताना बँकेला तांत्रिक अडचणी येत असल्याचे  बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक विभागाचे विभागीय व्यवस्थापक  बी. एस. टावरे यांनी सांगितले

गावाने लग्न लावून दिले

सियाचीन येथे सैन्य दलात कार्यरत असलेला अक्षय दादाजी पवार याने आपल्या लग्नासाठी वडिलांच्या खात्यावर तीन ते साडेतीन लाख रुपये जमा केले. हे पैसे काढण्यासाठी पवार कुटुंबीय बँकेत गेले असता खात्यावर पैसे नसल्याचे लक्षात आले. अपहाराचा हा प्रकार लक्षात येताच त्या विषयी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ऑनलाइन व्यवहाराविषयी सांगण्यात आले. मायक्रो एटीएमच्या मदतीने हा व्यवहार झाला असल्याचा अंदाज आहे. मात्र अक्षयच्या लग्नात पैसे नसल्याने पवार कुटुंबीयांनी काही हातउसणे पैसे घेतले, तर गावकऱ्यांनी काही पैसे जमा करत त्याच्या लग्नाला हातभार लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 3:47 am

Web Title: give the money back to auction the organs zws 70
Next Stories
1 महाविकास आघाडीचा भाजपला धक्का 
2 मालेगाव येथे जनता दलाच्या उमेदवाराचा दणदणीत विजय
3 महिला स्वच्छतागृहांविषयी महापालिका प्रशासन उदासीन
Just Now!
X