एकलहरे प्रकल्पातील प्रदूषित पाण्याचा फटका; तक्रार करुनही दुर्लक्ष

एकलहरा येथील औष्णिक वीज प्रकल्पातून गोदा पात्रात प्रदूषित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत असून त्वचारोगासह अन्य आरोग्यविषयक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य यंत्रणांनी डोळेझाक करण्याचे धोरण ठेवल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

शहरालगतच्या एकलहरे येथे औष्णिक वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पात वीजनिर्मिती प्रक्रियेत वापरले जाणारे प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. यामुळे गोदावरीच्या पाण्यात पाणवेलींचे साम्राज्य पसरले असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. या ठिकाणी एकलहरे वीज केंद्रासाठी गोदावरी नदीत साठवण बंधारा आहे. गोदावरी नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जात असल्याने एकलहरे, ओढा, शिलापूर, माडसांगवी, लाखलगाव आदी गावांत दुर्गंधी पसरत आहे. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पात्रातील पाणी फेसाळयुक्त झाले आहे. हे रसायनमिश्रित पाणी पिण्यासह शेतीला वापरण्यासारखे नाही.

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ, औष्णिक वीज प्रकल्प आदींकडे वेळोवेळी अर्ज, निवेदने दिली गेली. त्या वेळी केवळ पाहणी करण्याचे नाटक केले गेले. त्यापुढे कोणतीही कार्यवाही होत नसल्याची तक्रार ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी केली. गोदावरीत आधीच नाशिक शहरातील सांडपाणी, विविध कारखान्यांमधून रसायनमिश्रित पाणी थेट मिसळले जाते. त्यात एकलहरे प्रकल्पाची भर पडली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

नदीपात्रातील पाण्यात प्रचंड दुर्गंधी येत असून १० वर्षांपासून हे सुरू असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल एकनाथ पवळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या प्रदूषित पाण्याचा वापर केल्यास अंगाला खाज सुटणे, बारीक पुरळ येणे असे आरोग्याचे प्रश्न भेडसावतात. प्रदूषित पाण्यामुळे मासेही मरत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याविषयी कोणीही काही करण्यास तयार नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

 

कपालेश्वर मंदिर

शहर परिसरातील गोदाकिनारी असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरात मंगळवारी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. मंदिर परिसरात वाढणारी गर्दी पाहता व्यवस्थापनाने दर्शनासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त अन्य दरवाजाने भाविकांना प्रवेश खुला केला. भाविकांना दक्षिणेकडून आत जाण्यास आणि उत्तरेकडून बाहेर जाण्याचा मार्ग खुला करण्यात आला. तसेच मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मंदिर परिसरात प्रदक्षिणेस बंदी करण्यात आली होती. कपालेश्वर मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी शहर परिसरातून श्रींच्या मुखवटय़ाची पालखी काढण्यात आली.

शासकीय यंत्रणांची अनास्था

प्रदूषित पाण्याबाबत महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपनीने काय व्यवस्था केली याची विचारणाही केली. त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कंपनी काहीही उत्तर देत नसून महापालिकाही यासाठी सहकार्य करत नाही.

शंकर धनवटे (जिल्हा परिषद सदस्य)