शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या गोदावरी पात्राच्या स्वच्छतेकडे सिंहस्थ पर्वण्यानंतर दुर्लक्ष करण्यात आल्याने पात्र पुन्हा पाणवेलींनी वेढले गेले असून त्यात निर्माल्य, प्लास्टिक कचरा यांचीही भर पडली आहे. दक्षता अभियानाद्वारे नगरसेवक विक्रांत मते यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नगरसेवक मते यांच्या संकल्पनेतून वास्तवात आलेली निर्माल्य संकलन बोट (पाण्यावरील घंटागाडी) या योजनेस महानगरपालिकेकडून काही तांत्रिक अडचणीमुळे दीड महिन्यापासून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गोदापात्र पुन्हा अस्वच्छ व पाणवेलींनी हिरवेगार होण्यास सुरुवात झाली आहे. गोदापात्र प्रदूषणमुक्त न झाल्यास पुन्हा चार वर्षांपूर्वीची परिस्थिती उद्भवेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. चार वर्षांपूर्वी पानवेलींमुळे नदीपात्रात सर्वत्र घाण साचली होती. गोदापात्रात सांडपाणी मिसळले जाते. तसेच निर्माल्य व शिळे अन्न नदीपात्रात टाकल्याने पाणवेली व शेवाळाला ते पोषक ठरत आहे. सिंहस्थ पर्वण्यांदरम्यान प्रशासनाने नदी स्वच्छतेकडे योग्य लक्ष दिले होते. त्यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांमध्ये चांगला संदेश गेला. परंतु दीड महिन्यापासून निर्माल्य संकलन बोटीसारख्या योजनेस स्थगिती दिल्याने गोदापात्र पुन्हा अस्वच्छ झाले आहे. यावर पर्याय म्हणून नगरसेवक विक्रांत मते यांनी दक्षता अभियानच्या माध्यमातून स्वखर्चाने आनंदवल्ली पुलाजवळ नदीपात्र स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. नाशिककरांनी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नगरसेवक मते यांनी केले.