२८ ते ३० डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रम

मानवी संस्कृतीचा उगम, विस्तार आणि प्रगती नदीकिनारी झाली. आधुनिक युगातही शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नद्यांचे महत्त्व अबाधित आहे. नाशिक परिसराची जीवनदायिनी असा लौकिक असणाऱ्या गोदावरी नदीला तिचे गतवैभव प्राप्त व्हावे तसेच त्याचे महत्त्व नागरिकांना कळावे, या हेतूने पुढील आठवडय़ात ‘गोदास्पंदन’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संस्कार भारती आणि दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या वतीने २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘गोदास्पंदन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नदीचा उगम, माहात्म्य, पावित्र्य, पौराणिक संदर्भ, आध्यात्मिक महत्त्व, ऐतिहासिक घटना, मंदिरे, घाट, स्थानिक लोककला, लोककथा, सभ्यता आदींचे संकलन आणि जतन तसेच सद्य:स्थितीत नदीची झालेली दुरवस्था याकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती संस्कार भारतीचे रवींद्र बेडेकर यांनी दिली.

त्यासाठी जागरण-प्रबोधन-पथनाटय़, नृत्य, संगीत, चित्र, शिल्प, रांगोळी, सामाजिक समरसता आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोदास्पंदनच्या पहिल्या दिवशी २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्र्यंबकेश्वर येथे गोदा उगमस्थानी पूजन होऊन स्वच्छता या विषयावर जनजागृती कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता नाशिकच्या महात्मा फुले कलादालन परिसरात ‘चित्र, शिल्प, छायाचित्र’ प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्याचे उद्घाटन संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी दिल्ली येथील राष्ट्रीय कला संग्रहालयाचे अद्वैत गरनायक उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी शंकराचार्य संकुल येथे सकाळी १० वाजता जलतज्ज्ञ, नदीविषयक अभ्यासक, आध्यात्मिक गुरू यांचे चर्चासत्र होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विनायकदादा पाटील भूषविणार आहेत. या वेळी ‘महाराष्ट्राच्या विकासात गोदावरीचे स्थान’ या विषयावर मेरी नाशिकचे निवृत्त संचालक डी. एम. मोरे, ‘गोदावरी नदी पुनर्जीवन’ विषयावर डॉ. प्रा. प्राजक्ता बस्ते, राजेंद्र पंडित हे ‘गोदावरी पूर्वी, आता आणि पुढे’, विजय निपाणेकर ‘गोदावरीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व’, देवांग जानी हे ‘गोदावरी उपनद्या आणि कुंडाचे पुरातत्त्वदृष्टय़ा महत्त्व’, तसेच ‘गोदावरी पुनर्वैभवासाठी अपेक्षित उपाययोजना’ या विषयावरही चर्चा होणार आहे. या वेळी ‘गोदास्पंदन’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.  महोत्सवाचा समारोप रविवार, ३० डिसेंबर रोजी गोदाकाठावर होणार आहे. सकाळी ६ वाजता निर्मल गोदा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. बालाजी मंदिर ते दसक परिसर या ठिकाणी हे अभियान राबविले जाईल. दुपारी २ वाजता सामाजिक समरसता निर्माण व्हावी म्हणून शंभरपेक्षा अधिक जोडप्यांच्या हस्ते गोदापूजन होईल. दुपारी साडेतीन वाजता श्रीगुरुजी रुग्णालय सेवा संकल्प समितीच्या वतीने ३० पाडय़ांवरील कलाकारांचे लोकनृत्य होईल. तसेच गोदास्पंदनचे प्रतिबिंब असणारी ‘महारांगोळी’ रामकुंड परिसरात काढण्यात येणार आहे. सायंकाळी नृत्य आणि संगीताचा कार्यक्रम होईल.

या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त उपस्थित राहणार आहेत. गोदास्पंदननिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण सोहळा होईल. कार्यक्रमाचा समारोप गोदाआरतीने होईल. नाशिककरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.