पालकमंत्र्यांनी महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीला खडसावले, उपाययोजना न झाल्यास कारवाई

नाशिक : महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया केलेले फेसाळयुक्त पाणी थेट नदीपात्रात जाते आणि पाण्यावरील तवंग कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे कसे मारले जातात, याची प्रत्यक्ष अनुभूती पालकमंत्री छगन भुजबळ आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी घेतली. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था, शेवाळयुक्त पात्र, निळ्या पूररेषेत काँक्रीटचे बांधकाम यावरून उभयतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. गोदावरी स्वच्छ झाल्याशिवाय नाशिक स्मार्ट शहर होणार नसल्याचे भुजबळांनी सुनावले. प्रक्रिया न करता पाण्याचा एकही थेंब गोदापात्रात मिसळणार नाही, याची खबरदारी घ्यावी अन्यथा सरकार कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा त्यांनी दिला.

गोदावरी नदी, अविरल, निर्मल राहावी, यासाठी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली १० वर्षांपासून नमामि गोदा फाऊंडेशन प्रयत्न करत आहे. यामध्ये संत, शासन आणि समाजाला एकत्र आणले जात आहे. गोदावरी प्रगट दिनाचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वरहून अविरल निर्मल गोदावरी साक्षरता यात्रेला सुरुवात झाली. कलश घेऊन निघालेली यात्रा गुरुवारी शहरात आली. रामकुंडावर जाऊन गोदा पूजन आणि इतर कार्यक्रम होईल, असे यंत्रणांना वाटत होते. परंतु घडले उलटेच. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरी नदीची पाहणी केली.

तपोवन येथील मलनिस्सारण प्रकल्पास भेट दिली. तेव्हा सांडपाण्यावरील प्रक्रियेचे वास्तव लक्षात आले. प्रक्रिया केल्यानंतर फेसाळयुक्त पाणी गोदापात्रात सोडले जाते. फेस कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे मारले जातात. सांडपाण्याचा त्रास काठावरील गावांना होत आहे. न्यायालयाच्या निर्देशांबाबत याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी माहिती दिली. पाण्याची बीओडी मात्रा १० च्या खाली असणे गरजेचे आहे. प्रक्रियेविना सांडपाणी पात्रात जाणार नाही याकरिता व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. पालिका अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केंद्राच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचे नमूद केले. नूतनीकरणाचा हा विषय तीन वर्षांपासून रखडल्याचे पंडित यांनी निदर्शनास आणून दिले.

सांडपाण्यावरील प्रक्रियेचा विषय कायमस्वरूपी सोडविण्याची आवश्यकता आहे. कारखान्यांमधील सांडपाणी नदीपात्रात जाता कामा नये. गोदावरी स्वच्छ झाल्याशिवाय नाशिक स्मार्ट शहर होणार नाही. प्रशासनाने त्या अनुषंगाने पावले न उचलल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे भुजबळ यांनी सूचित केले.

निळ्या पूररेषेतील स्मार्ट कामावर आक्षेप

रामवाडी येथे गोदा प्रकल्पांतर्गत ‘अ‍ॅम्पि थिएटर’चे बांधकाम सुरू आहे. निळ्या पूररेषेत सिमेंट, काँक्रीटच्या वापरावर राजेंद्र सिंह यांनी आक्षेप घेतला. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी नेरीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम होत असल्याचे सांगितले. परंतु निळ्या पूररेषेत अशा बांधकामास नेरी कदापि मान्यता देणार नसल्याचे सिंह यांनी मांडले. गोदावरी नदीला जिवंत करण्यासाठी उगम ते अखेरच्या टप्प्यापर्यंतच्या प्रश्नांचा विचार करून तोडगा काढावा लागेल. प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे प्रदूषणमुक्तीचे काम प्रभावीपणे होईल, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.