News Flash

गोदावरी काँक्रीटीकरणमुक्त संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर

जागतिक पातळीवरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी २०१६ मध्ये सर जॉन सोरेल आणि बेनेई लान्स यांनी लंडन डिझाईन बिनाले प्रदर्शनाद्वारे एक व्यासपीठ तयार केले.

‘लंडन डिझाईन बिनाले’ प्रदर्शनात स्थान

नाशिक : नदीपात्र काँक्रीटमुक्त करून प्राचीन कुंडातील जिवंत जलस्रोतांनी गोदावरी पुनरुज्जीवित करण्याच्या संकल्पनेची ‘लंडन डिझाईन बिनाले २१’ प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी शुद्ध पाणी, शुद्ध हवा, ऊर्जा आणि वन या क्षेत्रातील ५० देशातील पर्यावरणस्नेही कामांची माहिती मागविली गेली होती. त्यात शुद्ध पाणी गटात गोदावरी नदी पुनरुज्जीवित करण्याच्या संकल्पनेला स्थान देण्यात आले आहे.

जागतिक पातळीवरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी २०१६ मध्ये सर जॉन सोरेल आणि बेनेई लान्स यांनी लंडन डिझाईन बिनाले प्रदर्शनाद्वारे एक व्यासपीठ तयार केले. या वर्षी संचालक एस. डेव्हलीन यांनी या प्रदर्शनाचे संकलन केले आहे. १० ते २७ जून या कालावधीत ते ऑनलाइन पद्धतीने पाहण्यास खुले करण्यात आले. यंदा प्रदर्शन अनुनाद या संकल्पनेवर आधारित आहे. ज्या संकल्पनेने मूलभूत बदल घडू शकतो आणि ज्याचे अनुकरण केल्याने विविध प्रश्नांना उत्तरे मिळू शकतील अशा जगभरातील कल्पना, प्रकल्पांची निवड करण्यात आली. साधारणत: ५० देशांमधून अंतिम टप्प्यासाठी पर्यावरणस्नेही कामे मागविली गेली.

भारतातील पर्यावरणस्नेही कामांतून असाधारण कामांची निवड करण्याची जबाबदारी बंगळूरु येथील वास्तुविशारद निशा मेथ्यू-घोष यांनी आणि त्यांच्या संघाने उचलली. ‘स्मॉल इज ब्यूटिफुल’ या तत्त्वावर आधारित शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध ऊर्जा आणि वने या क्षेत्रांतील १५९ प्रकल्पांची निवड करण्यात आली. यामध्ये शुद्ध पाणी सदरात गोदावरी नदीपात्र काँक्रीटीकरणमुक्त करून जिवंत जलस्रोतांचे पुनरुज्जीवन प्रकल्पांचा समावेश झाला आहे. गोदावरी नदीपात्रातील उर्वरित सिमेंट-काँक्रीटचे थर काढणे गरजेचे असून ते काढल्यास नदीत पाणी उपलब्ध होऊ  शकते. जिवंत जलस्रोतातील पाणी पुरातन कुंडात प्राप्त होऊन नदी पुन्हा प्रवाही होऊ  शकते. ही संकल्पना आणि त्यासाठी लागू केलेल्या काँक्रीट काढण्याच्या प्रकल्पाला प्रदर्शनात महत्त्वाचे स्थान देण्यात आले. याबाबतची माहिती काँक्रीटीकरणमुक्त गोदावरीसाठी अथकपणे लढा देणारे आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे देवांग जानी आणि गोदावरी नदीपात्र परिसरातील भूजल पुनरुज्जीवनाबाबत संशोधन करणाऱ्या डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी दिली.

सात वर्षे पाठपुरावा

शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर सिंहस्थ कुंभमेळ्यात स्नानासाठी व्यवस्था करण्याच्या नावाखाली सिमेंट काँक्रीटचे थरच्या थर चढविले गेले. नदीच्या दोन्ही काठांसह पुरातून कुंडावरही काँक्रीटीकरण करून मुक्त प्रवाहात अवरोध आणले गेले. त्याची झळ दरवर्षी पावसाळ्यात नाशिककरांना सहन करावी लागते. गोदावरी नदीला सिमेंट काँक्रीटच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. प्राचीन कुंडातील जलस्रोतांनी नदी प्रवाही करता येईल याकडे त्यांनी वारंवार लक्ष वेधले. सात वर्षांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेला गोदावरी पात्रातील प्राचीन कुंड काँक्रीटीकरणमुक्त करण्याच्या दिशेने पावले टाकावी लागले. नदीला पुनरुज्जीवित करण्याच्या या प्रकल्पाची या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:11 am

Web Title: godavari concrete free concept internationally ssh 93
Next Stories
1 युरियाचा तुटवडा भासणार नाही
2 खासगी शिकवणीवर्ग संचालकांचे आंदोलन
3 इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग शाळेत सुरू करण्यास परवानगी द्या
Just Now!
X