गोदाप्रेमी नागरी सेवा समितीची तक्रार

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी रामकुंड येथे वाजतगाजत सुरू करण्यात आलेल्या गोदावरी संवर्धन कक्षाला टाळे लागल्याची बाब गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने समोर आणली आहे. अनेक दिवसांपासून हे कार्यालय बंद आहे.

मागील चार ते पाच वर्षांपासून गोदावरी प्रदूषणाचा विषय गाजत आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका काही उपाय करीत असते. पण त्यात सातत्याचा अभाव असल्याची तक्रार केली जाते. नदीपात्रात निर्माल्य वा कचरा टाकला जाऊ नये म्हणून पुलांसह काही विशिष्ट भागात संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे.  नदीपात्रात कपडे व वाहने धुण्यावर र्निबध आणण्यात आले आहेत. निर्माल्यासाठी काठावर कलशाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांची नेमणूक झाली आहे. त्याचबरोबर गोदावरी व उपनद्यांच्या प्रदूषण रोखण्यासाठी तसेच गोदावरी संवर्धनाचे काम गांभीर्यपूर्वक करण्याच्या दृष्टिकोनातून रामकुंड परिसरात गोदावरी संवर्धन कक्षाचे कार्यालयही उघडण्यात आले. या कक्षास वाजतगाजत सुरुवात करत अधिकारी-कर्मचाऱ्यांची खास नियुक्ती करण्यात आली. मात्र, या ठिकाणी ना अधिकारी फिरकतात ना कर्मचारी अशी परिस्थिती या कक्षाची आहे. आता हा कक्ष कोणतीही पूर्वसूचना न देता बंद झाला आहे. अशी तक्रार गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आहे.

गोदावरी काठावर मांस विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आणावी या मागणीसाठी समितीचे पदाधिकारी बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता गोदावरी संवर्धन कक्षात गेले होते. त्यावेळी कार्यालयास टाळे लागलेले त्यांना दिसले. अनेक दिवसांपासून हे कार्यालय बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गोदावरी संवर्धन कक्ष बंद असल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन निवेदन द्यावे लागले.

गोदावरी प्रदूषणाबाबत दाखल याचिकेत याचिकाकर्ते देवांग जानी यांची तक्रार योग्य ठरवत न्यायालयाने महापालिकेला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. गोदा काठावर भाजी बाजार भरतो. उघडय़ावर मांस विक्री होते. मांस मच्छी पात्रात धुतली जातात. यामुळे गोदावरी प्रदूषित होऊन नदीचे पावित्र्य धोक्यात येते. त्यामुळे मांस विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणी समितीने केली आहे. मांस विक्रीमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असेही समितीचे अध्यक्ष देवांग जानी, नरेंद्र धारणे, चिराग गुप्ता, अतुल शेवाळे आदींनी म्हटले आहे.

संवर्धन कक्षाचे काम प्रगतिपथावर

रामकुंडावरील वस्त्रांतर गृहातील दुसऱ्या मजल्यावर गोदावरी संवर्धन कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. उपरोक्त कक्षात कार्यालय थाटण्यासाठी आवश्यक बाबींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या कक्षाचे उद्घाटन झालेले नाही. सध्या कक्षाचा वापर केवळ टेहळणी कक्ष म्हणून केला जातो. गोदावरी स्वच्छतेसाठी नेमलेले सुरक्षारक्षक आपले साहित्य ठेवण्यासाठी त्याचा वापर करतात. या कक्षाचे कार्यालयात रूपांतर झाल्यावर संपूर्ण कामकाज त्या ठिकाणी स्थलांतरित होईल.

रोहिदास दोरकुळकर (प्रमुख, गोदावरी संवर्धन कक्ष)