नदीपात्र काँक्रीटीकरणमुक्त करण्यास प्रारंभ

शहरातील अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत काँक्रीटीकरणात गुदमरलेले गोदावरीचे पात्र या जोखडातून मुक्त करण्याच्या कामास अखेर शुक्रवारी सुरुवात झाली. सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी गोदापात्रात काँक्रीटीकरणाचे थर चढविले गेले होते. यामध्ये १७ प्राचीन कुंडांचा समावेश आहे.

गोदावरी नदीपात्रास काँक्रीटीकरणमुक्त करून प्राचीन कुंड मूळ स्वरूपात पुनर्जीवित केल्यावर गोदावरी नदी पुन्हा नैसर्गिकरीत्या प्रवाही करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जवळपास सात ते आठ वर्षे त्यांनी शासन, प्रशासन दरबारी सतत पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात करून अखेर प्रकल्प गोदाअंतर्गत गोदापात्र काँक्रीटीकरणमुक्त करण्याच्या कामास शुक्रवारी गांधी तलावापासून सुरुवात झाली.

शहरातून मार्गस्थ होणारी गोदावरी होळकर पुलापासून ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत काँक्रीटीकरणाने वेढलेली आहे. प्राचीन कुंड मूळ स्वरूपात पुनर्जीवित करण्यासाठी तांत्रिक अहवाल वास्तुरचनाकार प्राजक्ता बस्ते आणि याचिकाकर्ते देवांग जानी यांनी मध्यंतरी पालिकेसमोर सादर केला होता. स्मार्ट सिटीच्या प्रकल्प गोदांतर्गत हे १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्याचे नियोजन झाले. त्या अनुषंगाने सर्वेक्षण होऊन कुंडांची लांबी-रुंदी, आकार, त्यांची सद्य:स्थिती याचे अवलोकन केले गेले.

नदीपात्रात काँक्रीटच्या थराचे मोजमाप घेतले गेले. १७ कुंडांच्या वर्तमान परिस्थितीचा नकाशा तयार झाल्यावर १९१७ तील डीएलआर नकाशानुसार पडताळणी झाली. हे कुंड मूळ स्वरूपात पुनर्जीवित करण्यासंबंधीच्या प्रक्रियेला

सुरुवात झाली. सद्य:स्थितीत गोदापात्रात प्रचंड गाळ, कचरा साचलेला आहे. पहिल्या दिवशी जेसीबीच्या साहाय्याने गांधी तलावातील माती, कचरा काढण्यास सुरुवात झाली. काँक्रीटीकरण मुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जानी यांच्या हस्ते विधिवत पूजन करून हे काम सुरू झाले.

गोदापात्र काँक्रीटीकरणमुक्त करण्याचे काम वेगवेगळ्या टप्प्यांत होणार आहे. पात्रात काही वर्षांत साचलेली माती, कचऱ्याचा थर काढला जात असल्याने परिसरात दरुगधी पसरली आहे. काढलेली माती, कचरा तातडीने हटविल्यास भाविकांना फारसा त्रास होणार नाही, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल हे दीड किलोमीटरचे गोदापात्र काँक्रीटीकरणापासून मुक्त केले जाईल. याच भागात रामकुंड तसेच १७ प्राचीन कुंड आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १९९२ आणि २००२ मध्ये गोदावरीचे हे पात्र काँक्रीटीकरणाच्या विळख्यात सापडले होते. त्या वेळी पात्रात आरसीसीचे थर चढविण्यात आले. गोदापात्र काँक्रीटीकरणात गेल्यावर काय अवस्था होईल, याचा कोणी तेव्हा विचारदेखील केला नव्हता. यामुळे विरोधही झाला नाही. भाविकांच्या सुविधेचे कारण पुढे करत कोटय़वधी रुपये गोदावरी कॉँक्रीटीकरणावर खर्च झाले. काँक्रीटीकरणापासून मुक्तीनंतर गोदापात्र मूळ स्वरूपात दृष्टिपथास येईल. प्राचीन कुंड पुनर्जीवित झाल्यामुळे नदी प्रवाही होण्यास मदत होणार आहे. – देवांग जानी (याचिकाकर्ते)